अवैध एजंटांवर शासनाने कठोर भूमिका घ्यावी - ज्ञानेश्‍वर मुळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

कोल्हापूर - ‘देश आणि परदेशातील अवैध दलालांना (एजंट) फास लावण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी. यासाठी परराष्ट्र खाते सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्‍वास परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर - ‘देश आणि परदेशातील अवैध दलालांना (एजंट) फास लावण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी. यासाठी परराष्ट्र खाते सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्‍वास परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी व्यक्त केला. त्या दृष्टीने प्रत्येक राज्यात विदेश भवन उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. कोल्हापूर प्रेस क्‍लबतर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. 

ते म्हणाले, ‘‘एजंटगिरी हा सामाजिक रोग आहे. त्यासाठी प्रशासन, पोलिस आणि प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे.  २०१४ नंतर परदेशात अडचणीत असलेल्या ९० हजार लोकांना सुरक्षितपणे भारतात आणले. युद्धजन्य स्थिती असो अथवा अन्य कोणत्याही कारणाने लोक फसले असतील तर, त्यांना माघारी आणले. सौदी अरेबिया, अबुधाबी, जॉर्डनसह अन्य काही देशांत भारतातील ८५ लाख लोक मजूर म्हणून काम पाहतात. काही प्रमाणात वकिलांचा खर्च परराष्ट्र विभाग उचलतो. परदेशात भारतीय दूतावास आहे, तेच भारतीयांचे खरे मित्र आहेत. दूतावासाला मोकळीक दिली आहे की, कोणत्याही कारणास्तव तेथे नागरिकाचे काम अडणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘नोकरीच्या निमित्ताने परदेशी जाणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन काही दलाल तयार झाले. हे लाल जसे भारतात आहेत तसे परदेशात आहेत. प्रवाशांची ने-आण करणारे अधिकृत दलाल आहेत, त्यांनी काही गडबड केली की आम्ही त्यांची गळपट धरू शकतो. अनधिकृत दलालावर नियंत्रण नसते. प्रत्येक राज्य सरकारने असे दलाल शोधून त्यांचा फास आवळावा.’’

पासपोर्टची २५१ केंद्रे सुरू आहेत. उर्वरित ६० केंद्रे दोन महिन्यात उघडली जाणार आहेत. कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर असल्याचा अभिमान आहे. दररोज दोनशे ते सव्वादोनशे अर्ज पासपोर्टसाठी येतात. नंतर म्हैसूरचा क्रमांक लागतो. कागदपत्रांची संख्या कमी करून लोकांना कमीत कमी त्रासात पासपोर्ट मिळाला पाहिजे हीच भावना आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात ३ कोटी ११ लाख स्थायिक झाले. त्यात ८५ लाख अमेरिकेत आहेत. मलेशियात २० लाख आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदार परराष्ट्र मंत्रालय घेते.
- ज्ञानेश्‍वर मुळे
, सचिव, परराष्ट्र खाते

Web Title: Kolhapur News Dnyneshwar Mule comment