डॉक्‍टर अपहरण प्रकरणात खंडणी प्रकरणी तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

राधानगरी - सावर्डे पाटणकर (ता. राधानगरी) येथील डॉ. सागर सुतार यांना मारहाण करून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरारी असलेल्या सहा अपहरणकर्त्यांपैकी तिघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली. १७ मे २०१८ च्या रात्री खिंडी व्हरवडे घाटात अपहरणनाट्य घडले होते.

राधानगरी - सावर्डे पाटणकर (ता. राधानगरी) येथील डॉ. सागर सुतार यांना मारहाण करून २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरारी असलेल्या सहा अपहरणकर्त्यांपैकी तिघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली. १७ मे २०१८ च्या रात्री खिंडी व्हरवडे घाटात अपहरणनाट्य घडले होते. काल रात्री उशिरा तिघा अपहरणकर्त्यांपैकी एकाला आंध्र प्रदेशातील विजयनगरहून आणल्यानंतर उर्वरित दोघांना गारगोटी व अवचितवाडी येथे पकडले. येथील न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

१६ मे २०१८ च्या रात्री साडेनऊच्या सुमारास डॉ. सुतार मोटारीतून सावर्डे पाटणकर गावाजवळ आले असता सहा बुरखाधारी तरुणांनी त्यांचे अपहरण केले. डॉ. सुतार यांना मारहाण करून संशयितांनी २५ लाखांची मागणी केली व ती रक्कम माद्याळ (ता. कागल) येथे देण्याची धमकी देत दहा हजार काढून घेऊन मध्यरात्री खिंडी व्हरवडे घाटात सोडून पळ काढला. 

पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. सुमारे तीन हजार मोबाईल कॉल डिटेल्स तपासात संशयित ऋषीकेश फुटाणकर (रा. सरवडे) हा सूत्रधार असल्याचे पुढे आले. त्याला विजयवाडा येथे सापळा रचून अटक केली, तर सचिन पांडुरंग भारमल (अवचितवाडी) व प्रवीण प्रकाश भाट (गारगोटी) यांनाही काल उशिरा ताब्यात घेतले.

तब्बल दोन महिने हुलकावणी
मोबाईल लोकेशनवरून फुटाणकर आंध्र प्रदेशात असल्याचे समजताच पोलिस निरीक्षक इंदलकर व उपनिरीक्षक कविटके यांच्यासह हवालदार सुरेश मेटील, नाईक संदीप मसवेकर, संदीप ढेकळे, के. डी. लोकरे यांनी म्होरक्‍याला अटक केली.

Web Title: Kolhapur News Doctor kidnapping case three arrested