राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक समर्थनार्थ गडहिंग्लजला मोर्चा

अजित माद्याळे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

गडहिंग्लज - केंद्र सरकारद्वारे येऊ घातलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक (एनएमसी बिल) व ब्रिज कोर्सच्या समर्थनासाठी येथील होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्‍टरांसह शिकाऊ विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगले यांना निवेदन देवून संघटनेच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याची मागणी केली.

गडहिंग्लज - केंद्र सरकारद्वारे येऊ घातलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक (एनएमसी बिल) व ब्रिज कोर्सच्या समर्थनासाठी येथील होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्‍टरांसह शिकाऊ विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगले यांना निवेदन देवून संघटनेच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याची मागणी केली.

गडहिंग्लज तालुका होमिओपॅथी मेडिकल असोसिएशनच्या पुढाकाराने निघालेल्या या मोर्चात तालुक्‍यातील डॉक्‍टरांसह ई. बी. गडकरी होमिओपॅथी महाविद्यालय व केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा प्रांत कार्यालयासमोर आला. राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक व ब्रिज कोर्सला मान्यता देण्याच्या मागणीचे फलक घेवून विद्यार्थी मोर्चासाठी आले होते. 

दरम्यान, प्रांताधिकारी राजापूरकर यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. हे विधेयक रूग्णासाठी हितकारक असून यामुळे ग्रामीण, दुर्गम भागातील रूग्णांना फायदेशीर आहे. विधेयकाच्या अनुषंगाने अस्तित्वात येणाऱ्या ब्रिज कोर्समुळे ग्रामीण व दुर्गम भागात होमिओपॅथीक व आयुर्वेदिक डॉक्‍टरांना अधिकृतरित्या औषधोपचार करण्यास मान्यता मिळणार आहे.

गेली कित्येक वर्षे देशाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्‍टर्स रूग्णसेवेची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत त्यांना मान्यतेचे दरवाजे खुले होणार आहेत. या भागात ऍलोपॅथीच्या डॉक्‍टरांनी पूर्ण पाठ फिरविली असताना आयुष डॉक्‍टर्स अहोरात्र रूग्णसेवा करीत आहेत. बीएचएमएस, बीएएमएस व एमबीबीएस यांचे अभ्यासक्रम व शैक्षणिक कालावधीही एकसारखाच असून ब्रिज कोर्सच्या माध्यमातून ऍलोपॅथी औषधाचे ज्ञान प्राप्त करून आयुष डॉक्‍टर्स कमी खर्चात योग्य रूग्णसेवा करू शकतील.

तसेच सध्या शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. तसेच जे कार्यरत आहेत, त्यातील बहुतांशी डॉक्‍टर हे आयुषचे आहेत. या विधेयकामुळे रिक्त पदांची भरतीही जलदगतीने होवून रूग्णसेवा सुधारणा आहे. यामुळे केंद्र सरकारच्या या विधेयकाला तालुक्‍यातील होमिओपॅथी व आयुर्वेदिक डॉक्‍टर्सचा पाठींबा असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. किरण खोराटे, उपाध्यक्ष डॉ. अशोक देसाई, सचिव डॉ. नरेंद्र पाटील, खजिनदार डॉ. मनोज पाटील, डॉ. पंकज विश्‍वकर्मा, विराज शुक्‍ल, सुधीर येसणे, सचिन पाटील, दिलीप मांजरेकर, अनुप्रेक्षा पाटील, बेनिता डायस, संजीवनी मांजरेकर, डॉ. मंगल मोरबाळे, सोनाली शुक्‍ल, नयना विश्‍वकर्मा, पूनम घोरपडे, तेजस्विनी कोतमिरे, डॉ. विद्या यादव, डॉ. सरिता कमते, डॉ. हर्षल कमते आदी या मोर्चात सहभागी झाले होते. 

Web Title: Kolhapur News Doctors rally in Gadhingalaj