कुत्र्याने घेतला ६५ जणांचा चावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

कोल्हापूर - पिसाळलेल्या कुत्र्याने टाऊन हॉल, भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी परिसरात धुमाकूळ घालत तीन वेगवेगळ्या घटनांत ६५ जणांचा चावा घेतला. त्यापैकी १४ जणांवर छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात (सीपीआर) उपचार सुरू आहेत. अन्य सर्वांना उपचारानंतर घरी जाऊ दिले

कोल्हापूर - पिसाळलेल्या कुत्र्याने टाऊन हॉल, भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी परिसरात धुमाकूळ घालत तीन वेगवेगळ्या घटनांत ६५ जणांचा चावा घेतला. त्यापैकी १४ जणांवर छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात (सीपीआर) उपचार सुरू आहेत. अन्य सर्वांना उपचारानंतर घरी जाऊ दिले. दुपारी एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत या कुत्र्याने शहरात भीतीचे वातावरण तयार केले होते. सैरभैर होऊन धावणारा हा कुत्रा व त्याला मारण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागलेले १५ ते २० तरुण असा मोठा गोंधळ या परिसरात उडाला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी लोकांची धावपळ उडाली. सायंकाळी चार वाजता महापालिकेच्या पथकाने नागरिकांच्या मदतीने कुत्र्याला पकडले; पण लोकांच्या मारहाणीत कुत्र्याचा मृत्यू झाला.  

आज दुपारी टाऊन हॉल उद्यानातून या कुत्र्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. निवांत बसलेल्या, झोपलेल्या लोकांच्या दिशेने धाव घेत या कुत्र्याने साऱ्या उद्यानात गोंधळ उडवला. शफिक आत्तार या ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्‍यावर झेप घेत त्याने लचका तोडला. रक्तबंबाळ अवस्थेत ते समोरच सीपीआरच्या दिशने पळत सुटले. टाऊन हॉलमधून बाहेर 
पडलेले कुत्रे चिमासाहेब चौक, शाहू स्मारक, भाऊसिंगजी रोड, महाराणा प्रताप चौक, लक्ष्मीपुरी परिसरात सैरावैरा धावू लागले. यामुळे अनेक दुचाकीस्वार गोंधळात पडले. 

कुत्र्याला हुसकवण्यासाठी १५ ते २० तरुण  काठ्या घेऊन कुत्र्यामागे धावू लागले. तरुणांच्या आरडा-ओरड्यामुळे लोकांना नेमके काय झाले, हे कळेनासे झाले. घटनेची माहिती महापालिकेच्या श्‍वान प्रतिबंधक पथकाला दिली. पथकाची जीपही या कुत्र्याच्या शोध घेऊ लागली. भाऊसिंगजी रोडवरील एका गल्लीत या कुत्र्याला लोकांनी घेरले. काहींनी त्याला मारहाण सुरू केली. त्याच वेळी त्यांच्यावर जाळे टाकून त्याला पकडले. त्यानंतर काही वेळात कुत्र्याचा मृत्यू झाला.  

कुत्रे चावल्यानंतर जखमेचे स्वरूप पाहून उपचाराची दिशा ठरवली जाते. जिथे कुत्र्याच्या चाव्यांमुळे मोठी जखम झाली आहे. त्या रुग्णांना दाखल करून घेतले जाते. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या इंजेक्‍शनची रिॲक्‍शन येते का, याची दोन तास खात्री केली जाते. त्यानंतर जखमेच्या ठिकाणी व दंडात इंजेक्‍शन दिले जाते. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी चार ते पाच इंजेक्‍शनचा कोर्स पूर्ण करावा लागतो. आज एकावेळी अनेक रुग्ण उपचारासाठी आल्याने विशेष सेवा द्यावी लागली.
- डॉ. वसंत देशमुख,
शल्यचिकित्सकप्रमुख, शाहू वैद्यकीय महाविद्यालय.

कुत्रे ॲग्रेसिव्ह होणे, पिसाळणे हे त्या त्या कुत्र्याच्या आरोग्य पातळीवर असते आणि तसे होत राहणार हेही खरे आहे. त्यामुळे कुत्रे चावण्याच्या घटना घडतच राहणार. यावर भटक्‍या कुत्र्यांची संख्या कमी करणे, त्यांचे निर्बीजीकरण करणे हाच उपाय आहे. महापालिकेने सामाजिक संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने ते करावे. आम्ही मदत करण्यास तायार आहोत. 
- डॉ. चंद्रहास कापडी,
पशुवैद्यकीय अधिकारी 

जखमींची नावे 
ओंकार विष्णू बल्लाळ (वय १३, रा. राजेंद्रनगर), अजरुद्दीन नजीर जमादार (वय २७, रा. लक्ष्मीपुरी), भीमराव कृष्णा पाटील (वय ४०, रा. भांडगाव), अशोक जयसिंग रजपूत (वय ५९, रा. रजपूतवाडी), रामभाऊ सूर्यकांत पांडव (वय ३२, रा. महाराणा प्रताप चौक), शफिक अब्दुल अत्तार (वय ६०, रा. शनिवार पेठ), धनाजी पाटील (वय ४४, रा. कसबा पेठ पन्हाळा) आदी.

Web Title: Kolhapur News dog bite to 65 peoples