डॉल्बी रोखणारा जामर कोल्हापुरात

सुधाकर काशीद
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

एका अवलियाने केला तयार - परदेशातही वापर सुरू; अधिकाऱ्यांनी केली चर्चा

कोल्हापूर - बेकायदेशीर ध्वनियंत्रणा लावण्याचा प्रयत्न झाल्यावर, नेत्यांशी, अतिअत्साही कार्यकर्त्यांशी संघर्ष करत पोलिसांना ध्वनियंत्रणा रोखता येते; पण कोणताही संघर्ष न करता दणदणाट करणाऱ्या बेकायदेशीर डॉल्बीचा आवाज रोखणारा जामर कोल्हापुरात यापूर्वीच तयार झाला आहे. त्याचे तंत्रज्ञान इतके चांगले आहे, की तो चक्क परदेशातही वापरला जात आहे.

एका अवलियाने केला तयार - परदेशातही वापर सुरू; अधिकाऱ्यांनी केली चर्चा

कोल्हापूर - बेकायदेशीर ध्वनियंत्रणा लावण्याचा प्रयत्न झाल्यावर, नेत्यांशी, अतिअत्साही कार्यकर्त्यांशी संघर्ष करत पोलिसांना ध्वनियंत्रणा रोखता येते; पण कोणताही संघर्ष न करता दणदणाट करणाऱ्या बेकायदेशीर डॉल्बीचा आवाज रोखणारा जामर कोल्हापुरात यापूर्वीच तयार झाला आहे. त्याचे तंत्रज्ञान इतके चांगले आहे, की तो चक्क परदेशातही वापरला जात आहे.

आताही तसा जामर तयार करून देणे इथल्या एका कल्पक तंत्रज्ञाला शक्‍य आहे; पण जरी चांगल्या हेतूने हा जामर लावला जाणार असला, तरी त्या निमित्ताने काही जणांचे शत्रुत्व ओढवून घेतले जाण्याची या तंत्रज्ञाला भीती आहे. त्यामुळे कोल्हापुरात जामर देण्यास तो ‘होय, नाही’ अशा भूमिकेत आहे. दरम्यान, आज शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी या तंत्रज्ञाशी प्राथमिक चर्चा केली असल्याचे समजते.

या ध्वनियंत्रणेतून बाहेर पडणाऱ्या साउंड वेव्हजमधील पॉझिटिव्ह वेव्हजचे निगेटिव्ह वेव्हजमध्ये रूपांतर करून, त्याचा आवाज बंद करणे, अशा स्वरूपाचे या डॉल्बी जामरचे तंत्र आहे. या वेव्हज पकडू शकणारा ॲन्टेना जितक्‍या क्षमतेचा, त्या प्रमाणात त्या क्षेत्रात त्याचा परिणाम दिसून येतो.

पोलिसांनी त्यांच्या पाठीवरील एखाद्या सॅकमध्ये हा जामर ठेवला व बेकायदेशीरपणे लावलेल्या यंत्रणेसमोर पोलिस गेले, तर तो बेकायदेशीर डॉल्बी बंद पडू शकतो किंवा त्याचा आवाज विस्कळित होऊ शकतो, असा या तंत्रज्ञाचा दावा आहे; मात्र ‘या सर्व तंत्रज्ञानाला कायदेशीर संरक्षण असावे, तसे मान्यतापत्र मिळावे,’ अशी त्यांची अपेक्षा आहे.

कोल्हापुरात तीन वर्षांपूर्वी हा जामर तयार झाला. त्यावेळीही या जामरचा उपयोग बेकायदेशीर ध्वनियंत्रणा लावणाऱ्या मंडळासाठी करण्याची चर्चा झाली होती; पण ही चर्चा फार पुढे जाऊ शकली नाही; पण हा जामर परदेशात एका कंपनीमार्फत विकला गेला. त्यामुळे आता तसाच्या तसा जामर या तंत्रज्ञाला करून विकता येणार नाही; पण थोडेफार बदल करून नव्या स्वरूपात जामर तयार करण्याची त्याची तयारी आहे. 

कोल्हापुरात आता झालेला ध्वनियंत्रणेचा अतिरेक हा काही ठराविक व्यावसायिकांनी ‘अंतर्गत’ केलेल्या बदलामुळे झाला आहे. फक्त दोन टॉप, दोन बेस असे काही जण म्हणत असले; तरी त्यातही काही ‘करामती’ केल्याने त्याचा आवाज कानठळ्या फुटतील इतका मोठा झाला आहे. अतिरिक्त पोलिस प्रमुख सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक संजय साळूंखे यांनी गणेश प्रतिष्ठापना मिरवणुकीत अशी यंत्रणा रोखून पोलिसांची ताकद दाखवून दिली आहे; मात्र त्यासाठी वाद ओढवून घ्यावा लागला आहे; पण आता बेकायदेशीर यंत्रणा रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर झाला, तर आणखी सहजशक्‍य होणार आहे.

मोबाईल, टीव्हीवरही परिणाम 
जामरमुळे बेकायदेशीर ध्वनियंत्रणेवर परिणाम होतो; पण ज्या परिसरात हा जामर लावला जातो तेथील मोबाईल, टीव्ही प्रक्षेपणावरही याचा परिणाम होतो. ध्वनियंत्रणेच्या वेव्हजवर परिणाम होताना त्याबरोबरच मोबाईल व टीव्हीच्या वेव्हजही त्यामुळे विस्कळित होतात.

स्थानिक दबावाची भीती 
कोल्हापुरातल्याच या तंत्रज्ञाला साहजिकच स्थानिक दबावाची भीती आहे. त्यामुळे आपले नावही कोठे येऊ नये अशी खबरदारी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण हे बेकायदेशीर विनापरवाना डॉल्बीसाठीच करत असलो, तरी त्याचे काही परिणामही होऊ शकतील अशी त्यांना वाटणारी भीतीही साहजिक आहे. यासंदर्भात पालकमंत्री, प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

Web Title: kolhapur news dolby control jamar in kolhapur