चंद्रकांतदादांनी करून दाखवलं

निवास चौगले
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक यशस्‍वी; ढोलाने बंद केला डॉल्बीचा आवाज

कोल्हापूर - राजकीय फायदा, तोटा याचा विचार न करता पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली डॉल्बीविरोधातील भूमिका, डॉल्बी लागता कामा नये, अशा त्यांनी प्रशासनाला दिलेल्या सक्त सूचना आणि त्यांच्या या आवाहनाला सर्वसामान्यांतून मिळालेला मोठा पाठिंबा, यामुळे कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त करून दाखवण्याचे अवघड काम दादांनी करून दाखवले.

डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक यशस्‍वी; ढोलाने बंद केला डॉल्बीचा आवाज

कोल्हापूर - राजकीय फायदा, तोटा याचा विचार न करता पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली डॉल्बीविरोधातील भूमिका, डॉल्बी लागता कामा नये, अशा त्यांनी प्रशासनाला दिलेल्या सक्त सूचना आणि त्यांच्या या आवाहनाला सर्वसामान्यांतून मिळालेला मोठा पाठिंबा, यामुळे कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक डॉल्बीमुक्त करून दाखवण्याचे अवघड काम दादांनी करून दाखवले.

गणेशोत्सव आणि राजकीय नेतृत्व यांचे मोठे ऋणानुबंध आहेत. मंडळांना राजकीय नेतृत्वामुळे मोठा देणगीदार, तर मंडळामुळे मोठी ताकद राजकीय नेतृत्वामागे असे समीकरणच तयार झाले होते. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षांत विसर्जन मिरवणूक म्हणजे या मार्गावरील लोकांनी घर सोडूनच जायची परिस्थिती होती. डॉल्बीच्या उंचच उंच भिंती, त्यातून काळजात धडकी भरेल, असा निघणारा आवाज आणि या आवाजावर वेडेवाकडे नृत्य करणारी तरुणाई, असे ओंगळवाणे चित्र कोल्हापुरात पाहायला मिळाले होते. २०१४ ला सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या आवाजावर बंदी घातल्यानंतर कोल्हापुरात त्याचा काहीएक परिणाम झाला नव्हता. अनेकांची आयुष्ये या डॉल्बीमुळे उद्‌ध्वस्त झाल्याच्या घटना कोल्हापुरात घडल्या आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर यावर्षी पालकमंत्री पाटील यांनी मात्र डॉल्बीविरोधात कठोर भूमिका घेतली. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद तशी जेमतेमच. या उत्सवाच्या माध्यमातून भाजपचा विस्तार करण्याची संधी होती. त्यासाठी मंडळांना डॉल्बी लावू द्यावा, असे कार्यकर्त्यांचे मत होते. परंतु, राजकीय फायदा किंवा तोटा याचा विचार न करता दादांनी डॉल्बीला विरोध केला.

कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लागणार नाही, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे, तर डॉल्बीला परवानगी द्या, म्हणून बैठकीसाठी आलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही खडे बोल सुनवायला दादांनी मागे-पुढे पाहिले नाही. तरीही काही मंडळे आम्ही डॉल्बी लावणारच, असा हट्ट धरून होते. अशा मंडळांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने नेतृत्व मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन बेस, दोन टॉप लावण्यास परवानगी द्यावी, यासाठी श्री. क्षीरसागर यांनी उपोषण केले; पण त्यालाही दादा असो किंवा प्रशासनाने दाद दिली नाही. आमच्या व्यवसायावर पाणी फिरल्याची तक्रार घेऊन आलेल्या व्यावसायिकांनाही दादांनी डॉल्बी सोडून बोला, असे सांगितले. त्यांची ही कठोर भूमिका आणि त्यांनी पोलिस व प्रशासनाला दिलेले पाठबळ, केवळ यामुळेच कोल्हापूरची मिरवणूक डॉल्बीमुक्त झाली. 

बदनामी जास्त
कोणत्याही परिस्थितीत मिरवणुकीत डॉल्बी लागणार नाही, हे ज्या वेळी श्री. पाटील यांनी जाहीर केले, तेव्हापासून मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर टोकाची टीका झाली. सोशल मीडियावर तर त्यांना बदनाम करणारे अनेक संदेश, व्हिडिओ क्‍लिप फिरू लागल्या. विरोधी पक्षातील लोकांनीही त्यांच्यावर टीकाटिपण्णी केली नसेल त्यापेक्षा जादा टीका त्यांच्या या एका निर्णयाने झाली; पण असल्या प्रकाराकडेही श्री. पाटील यांनी दुर्लक्ष केले. 
 

मंडळे, पोलिसांचेही योगदान
श्री. पाटील यांनी डॉल्बीमुक्तीची भूमिका जाहीर करून त्यावरच ते शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यांच्या या आवाहनाला मंडळांनीही सहकार्य केले; तर पोलिस प्रशासनानेही योग्य त्या वेळी योग्य ती पावले उचलली. श्री. पाटील यांचे यात मोठे योगदान आहे. त्याचबरोबर डॉल्बी न लावलेली मंडळे व पोलिस यांच्याही प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

Web Title: kolhapur news dolby free ganeshotsav in kolhapur