डॉल्बी लावला, चूक झाली, संधी गेली

डॉल्बी लावला, चूक  झाली, संधी गेली

२०१५ च्या गुन्ह्यातील तरुणांच्या व्यथा - नोकरी, पासपोर्टला मुकले
कोल्हापूर - गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टीम वाजवली. ठेक्‍यावर अनेक जण थिरकले. दुसऱ्या दिवशी सगळे आपापल्या कामाला लागले. पण त्यावेळी मंडळावर दाखल झालेल्या गुन्हाचा फटका अध्यक्ष - कार्यकर्त्यांना बसला. काही जण नोकरीला मुकले तर काही जणांना पासपोर्ट मिळविताना नाकात दम आला. फक्त राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावर २०१५ ला दाखल झालेल्या १६ मंडळांच्या १५७ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यांना आज मनःस्ताप होत आहे.

गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीची झलक राजारामपुरीत गणरायाच्या आगमनावेळी दिसून येते. तेथे डॉल्बीचा दणदणाट झाला की पुढे मिरवणुकीत त्याचे पडसाद उमटतात. २०१५ मध्ये राजारामपुरीतील मंडळांनी मुख्यमार्गावर डॉल्बी सिस्टीमचा दणदणाट केला. कार्यकर्त्यांना रोखणे हे पोलिसांच्या हाताबाहेर गेले. अखेर तत्कालीन पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांवर गुन्हे दाखल झाले. तब्बल १६ मंडळांच्या १५७ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्याची नोंद दफ्तरी घेतली. त्यावेळी तरुणांनी रुबाब (?) मारला. मंडळाच्या नावाखाली स्वतःचे  मार्केटींग केले. पण आता त्यांना पश्‍चाताप होत आहे. त्यांच्या वैयक्तीक जीवनात अनेक  अडचणींना समोरे जावे लागत आहे.

२०१५ मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना आता चुक झाल्याची जाणीव होत आहे.

राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील एका तरुणाला महापालिकेत नोकरीची संधी मिळाली होती. काही दिवस रोजंदारी आणि त्यानंतर कायम होण्याचीही संधी होती. तेथे पोलिसांकडून चांगल्या वर्तवणुकीचा दाखला आणण्यास सांगितले होते. मात्र दाखल्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख आला. त्यामुळे त्याची नोकरीची संधी हुकली. आजही तो नोकरीसाठी धडपडत आहे.

त्याच्यासाठी डॉल्बी सिस्टीमचा आनंद क्षणीक झाला,  मात्र त्याचा फटका त्याच्या करीअरला बसला.राजारामपुरीतील मुख्यमार्गावरील, शाहूनगर परिसरातील १६ तरुण मंडळातील १५७ जणांच्या यादीतील सात जणांना पासपोर्टसाठी अडविण्यात आले. त्यामुळे काहींची परदेश वारीची संधी हुकली. काहींना न्यायालयीन प्रक्रीया पूर्ण करावी लागली. काहीजण अद्याप पासपोर्ट घेण्यासाठी हेलपाटे मारत आहेत. डॉल्बी लावून चुक केल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. पोलिस ठाण्यात हेलपाटे मारून यातून मार्ग काढण्याची विनंती संबंधित कार्यकर्ते पोलिसांकडे करीत आहेत. केवळ राजारामपुरी पोलिस ठाण्यातील १५७ जण या फेऱ्यात अडकले आहेत. अशीच स्थिती जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यात आहे. डॉल्बीबाबतच्या इर्षेतून करिअर अडचणीत येण्याची अनेक उदाहरणे जिल्ह्यात घडली आहेत.

गुन्हा काय दाखल होतो...
भा.द.वि.स. १८८, २९०, २९१, ३४, सह महाराष्ट्र पो.का.क. १३१, १३४, १३५, १४० व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६चे कलम १५ सह ध्वनिप्रदूषण नियम  २००० चे नियम क्र. ३ (१), ४(१), ५ (४) प्रमाणे गुन्हे दाखल केले जातात. यामुळे चारित्र्य दाखला देताना याचा उल्लेख दाखल्यात केला जातो. त्यामुळे नोकरी, पासपोर्टसह इतर ठिकाणी त्याचा फटका बसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com