डॉल्बी लावाल तर याद राखा... - संजय मोहिते

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे, याला आमचा विरोध नाही; पण डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर याद राखा, त्या १६ मंडळांसारखे फसाल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीवेळी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. 

कोल्हापूर - गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे, याला आमचा विरोध नाही; पण डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण कराल तर याद राखा, त्या १६ मंडळांसारखे फसाल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीवेळी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. 

मोहिते म्हणाले, ‘‘कोल्हापूर परिक्षेत्रात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने पोलिस प्रशासनाकडून मंडळांच्या बैठका घेतल्या जात आहेत. पारंपरिकरित्या हा सण उत्साहात साजरा झाला पाहिजे. त्यासाठी तालीम मंडळांना मंडप उभारणीपासून, साउंड सिस्टिम, मिरवणूक आदींची परवानगी मिळविण्यात त्रास होऊ नये, यासाठी आम्ही एक खिडकी योजना सुरू केली आहे.

किचकट प्रक्रियेशिवाय हे परवाने दिले जात आहेत. तालीम मंडळांनी उत्सवात डॉल्बी लावण्याचा प्रयत्न करू नये. गेल्या वर्षी डॉल्बी लावण्याचे परिणाम शहरातील १६ मंडळांचे कार्यकर्तेच नव्हे, तर डॉल्बी व ट्रॅक्‍टरचालक-मालक भोगत आहेत, याचे भान सर्वांनी ठेवावे. गणेशोत्सवातून परिसरात सीसीटीव्ही लावणे, स्टडी सेंटर, ग्रंथालय, गरजूंना वैद्यकीय मदत, शैक्षणिक साहित्य वाटप असे विधायक उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. या वेळी अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते उपस्थित होते.  

४८ गुंडांना हद्दपार -
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर संघटित गुन्हेगारांसह फाळकूटदादा, मटका, जुगार अड्डे चालविणाऱ्या ४८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांची यादी तयार केली जात आहे. त्यात सुमारे १६९ जणांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यातील काही प्रस्ताव हे प्रांत कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यावर गणेशोत्सवापूर्वी कारवाई केली जाईल, असे अधीक्षक मोहिते यांनी सांगितले.

मंडप उभारणीबाबात दक्षता
गणेशोत्सव मंडळांनी वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभे करावेत. जे मंडप वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे ठरतील अशा मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यातून योग्य तो मार्ग काढला जाईल. याबाबत पोलिस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असे अधीक्षक मोहिते यांनी स्पष्ट केले.

Web Title: kolhapur news dolby issue