डॉल्बी अतिरेक थांबू शकतो

डॉल्बी अतिरेक थांबू शकतो

पोलिसांचा निर्धार हवा - २०१३ मध्ये करून दाखवले  

कोल्हापूर - डॉल्बी लावणारच... डॉल्बी लावायचा नाही, अशी उलटसुलट चर्चा २०१३ सालीही सुरू होती. डॉल्बी लावणारच म्हणणाऱ्यांनी स्पिकरच्या भिंतीच्या भिंती उभारण्याची तयारी केली होती. एकदा मिरवणुकीत डॉल्बी घुसवला की, मग तो बंद करायला पोलिस धाडस करत नाहीत, ही समजूत त्यापूर्वीच्या दोन-तीन वर्षांच्या मिरवणुकीतील अनुभवाने पक्‍की झाली होती. त्यामुळे २०१३ मध्येही मिरवणुकीपूर्वी ताराबाई रोडवर डॉल्बी बांधण्यास सुरवात झाली होती. आपण कायद्याचा भंग करतोय, याची फिकीरच कोणाला नव्हती.

एवढ्यात त्यावेळच्या अतिरिक्‍त पोलिस अधीक्षिक ज्योतिप्रिया सिंग आठ-दहा पोलिसांचा ताफा घेऊन मिरवणूक मार्गात आल्या. त्यांनी पाहिले, डॉल्बी स्पिकरच्या भिंती उभ्या करण्याचे काम बिनधास्त सुरू होते. तरुणांचे घोळकेच्या घोळके डॉल्बीच्या समर्थनार्थ ताराबाई रोडवर उभे होते.

ज्योतिप्रिया सिंग एका मंडळासमोर गेल्या. त्यांनी शांतपणे विचारले, ‘कौन है । इस मंडल का अध्यक्ष?’ एक जण पुढे आला. ‘मॅडम मैं हूँ।’ त्याला त्यांनी फक्‍त एका वाक्‍यात सांगितले, ‘दो बेस, दो टॉप, इसके अलावा कुछ ट्रॉलिपर रखा, तो याद रखना!’ तशाच त्या पुढे गेल्या आणि डॉल्बीचा दणदणाट करायचाच या तयारीने आलेल्या मंडळासमोर उभ्या राहू लागल्या. ‘पाच मिनिट मे स्पिकर निकालना, सिर्फ दो बेस, दो टॉप,’ असे सुनावू लागल्या. दोन-तीन मंडळे कुरकूर करू लागली. त्यांनी त्यांना त्यांच्या भाषेत इशारा दिला. बस्स एवढा इशारा उपयोगी पडला आणि त्या वर्षीची मिरवणूक दोन बेस, दोन टॉप एवढ्यावरच पार पडली. पोलिसांनी केवळ आपल्या जरबेवर कायद्याची ताकद दाखवून दिली. 

आता गेले काही दिवस फक्‍त इशारे देण्याचे काम चालू आहे. एक वेळ इशारा ठीक आहे; पण पोलिसांच्या हातात कारवाईचे अधिकार असताना केवळ शाब्दिक इशाऱ्यावर भर दिला जात आहे. दोन बेस, दोन टॉपच्या वर जादा काही असेल तर त्या मंडळाला मिरवणुकीत सोडायचंच नाही, असं पोलिसांनी ठरवलं तर सहज शक्‍य आहे. 

या मिरवणुकीत केवळ ज्योतिप्रिया सिंग यांनीच नव्हे, तर मिरजकर तिकटीजवळच्या ‘हॉट स्पॉट’वर मा. शा. पाटील यांच्यासारख्या पोलिस निरीक्षकांनीही हे करून दाखवले आहे. तसेच २०१६ साली रात्री १२ ते दीड वाजेपर्यंत डॉल्बीचे मिक्‍सर काढून घेऊन त्यांना तत्कालिन पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी रोखून दाखविले आहे. 

डॉल्बी लावणारच, असा दम काही मंडळांचे ठराविक कार्यकर्ते फेसबुक, व्हॉटस्‌ॲपवरून देऊ लागले आहेत. गणेश विसर्जनाची मिरवणूक उत्साहात, आनंदात असली पाहिजे, यात शंकाच नाही; पण हा उत्साह हलगी, घुमके, लेझिम, झांजपथक, बॅंडपथक, टिपरी, ढोल-ताशा पथक, पारंपरिक वाद्ये, नृत्यपथक, आकर्षक रोषणाई यातूनही मिळतो. गाण्याच्या तालावर नाचायचेच असेल तर दोन बेस दोन स्पिकरवरही माहोल निर्माण होऊ शकतो; पण स्पिकरच्या भिंती, त्यातून होणारा दणदणाट, कडकडाट म्हणजे गणेश उत्सव ही समजूत काहींची आहे आणि त्यांचीही हौस साऱ्या शहराने निमूटपणे सहन करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांना पाठबळ देणारे राजकीय नेते कोण कोण आहेत? याचे गेल्या आठ-दहा वर्षांचे रेकॉर्ड पोलिस ठाण्यात आहे. पोलिसांनी या वर्षी मिरवणुकीला सुरवात होतानाच आपली ताकद दाखवली तर हे थांबणार आहे. नाही तर डॉल्बी लावल्यास कडक कारवाई करू, असले ‘इशारे पे इशारे’ दरवर्षी हवेतच विरणार आहेत.

काहींकडून कायदा-सुव्यवस्थेची चर्चा 
आवाजाच्या मर्यादेचा भंग करून डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर कारवाई केली तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, असली चर्चा करण्यात काही पोलिस अधिकारीच पुढे आहेत आणि त्यामुळेच काही ठराविक मंडळांचे फावते आहे. डॉल्बी लावणाऱ्या या मंडळाच्या मागे सगळे कोल्हापूर आहे, ही निव्वळ सोयीसाठी केली जाणारी धूळफेक आहे. वास्तविक डॉल्बीच्या दणदणाटाला कोल्हापूरकर वैतागला आहे. मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्तेही वैतागले आहेत; पण पाच-पन्नास ठराविकांच्या आग्रहासाठी या वर्षी पुन्हा डॉल्बीची चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com