आली रे आली... आता पोलिसांची वेळ आली!

राजेश मोरे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ‘तुमची विसर्जन मिरवणूक, तर आमची आगमनाची मिरवणूक’, या इर्षेवर राजारामपुरीत निघणाऱ्या मिरवणुकीत उत्सवाच्या पहिल्याच दिवशी सिस्टीमचा (डॉल्बी) दणदणाट रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या मिरवणुकीत उद्‌घाटनाला राजकीय नेत्यांची रांग लागलेली असते. त्यामुळे ध्वनिप्रदूषणावर कारवाईसाठी पोलिस या दिवशी ‘सिंघम’ची ‘आली रे आली... आता पोलिसांची वेळ आली’ अशी भूमिका घेणार की डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या ‘गांधारी’ची भूमिका घेणार, हे पहिल्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. 

जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणार याचा गाजावाजा दरवर्षी पोलिस प्रशासनाकडून केला जातो. जणू डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा होणार, असे वातावरण तयार होते. अखेर व्हायचे तेच होते. काही मंडळांच्या धाडसाने डॉल्बीचा दणदणाट मिरवणुकीत होतोच, असे जणू समीकरण बनले आहे. 

सिस्टीमचा दणदणाट लावून ध्वनी प्रदूषण करण्याची खरी सुरवात राजरामपुरीतील आमगाच्या मिरवणुकीतच होते. शक्तिप्रदर्शनासाठी डॉल्बी लावण्याचा अट्टहास जवळपास प्रत्येक तालीम मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांकडून केला जातो. पण पोलिस प्रशासनाची आक्रमक भूमिका, कारवाईचे स्वरूप, यामुळे ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून त्याला विरोध होतो. अखेर हा वाद थांबतो तो ‘राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत डॉल्बी लागला तर आपणही विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावू’ यावर. त्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष असते ते राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीकडे. राजारामपुरीतील मंडळे आगमन मिरवणुकीत शक्तिप्रदर्शन करण्याकडे त्यांचा कल असतो. मिरवणुकीच्या उद्‌घाटनासाठी राजकीय नेतेमंडळींचा लवाजमा उद्‌घाटनाला बोलवायचा. याच राजकीय वजनाच्या जोरावर डॉल्बीचा दणदणाट करण्याची पद्धत काही मंडळांनी अवलंबली आहे. 

राजारामपुरीत ‘सिंघम’ की ‘गांधारी’
राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीतील डॉल्बीचा दणदणाट हा दोन वर्षांपूर्वी स्थानिक पोलिसांच्या मदतीने रोखण्यात आला होता. यंदा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा विडा उचलला आहे. गतवर्षी १६ मंडळांवर डॉल्बीबाबत कारवाईही करण्यात आली आहे. तरीही राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीतील सिस्टीमचे (डॉल्बी) चे आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण येथे डॉल्बी वाजला तर विसर्जन मिरवणुकीत वाजणार, अशी परिस्थिती आहे. यंदाच्या राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत पोलिस सिंघमची भूमिका घेणार की डोळ्यांवर पट्टी बांधून गांधारीची भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: kolhapur news dolby system issue