यंदाची शिवजयंती गडकोटांवर - डॉ. अमर अडके

यंदाची शिवजयंती गडकोटांवर - डॉ. अमर अडके

कोल्हापूर - मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे उत्तुंग, दुर्गम आणि अवघड अशा गिरिदुर्गांवर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी १८ व १९ फेब्रुवारीला ‘श्री शिवजयंती विशेष दुर्ग लिंगाणा मोहीम’चे आयोजन केले आहे. या मोहिमेतून ‘सशक्त तरुण-सशक्त महाराष्ट्र’ हा संदेश दिला जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मैत्रेय प्रतिष्ठान ही गडकोट, डोंगरदऱ्या, अरण्ये यांची भटकंती, जतन आणि संवर्धनाला वाहिलेली चळवळ आहे. ‘मैत्रेय’तर्फे गेल्या अनेक वर्षांत शेकडो गडकोट तसेच पदभ्रमंती मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईमध्ये बलोपासना, विधायक वैचारिक ऊर्जा वाढीस लागावी, या उद्देशाने दुर्ग लिंगाणा दोराच्या साहाय्याने चढून रायगड, तोरणा, राजगड या गिरिदुर्गांच्या साक्षीने उत्तुंग दुर्गमाथ्यावर शिवजयंती साजरी केली जाणार आहे. मोहिमेत कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक आदी ठिकाणचे २८ गिर्यारोहक सहभागी होणार आहेत. या मोहिमेत प्रचलित आरोहण आणि अवरोहण मार्गाऐवजी वेगळ्या वाटांनी चढाई केली जाणार आहे. तसेच दुर्ग आणि मार्गावरील ऐतिहासिक स्थापत्य अवशेषांच्या अभ्यासपूर्ण नोंदीही केल्या जाणार आहेत.

मोहिमेची सुरवात रविवारी (ता. १८) होणार आहे. रायलिंग पठार परिसरात पदभ्रमंती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथील वाड्यावस्तींत गरजेच्या वस्तू भेट दिल्या जाणार आहेत. त्यानंतर सोमवारी (ता. १९) भल्या पहाटे मुख्य मोहीम सुरू होणार आहे. समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर हा किल्ला आहे.

मोहिमेत तब्बल १२३० फूट उंच दोरांच्या साहाय्याने चढून लिंगाणा मोहीम यशस्वी करून शिवजयंती साजरी केली जाणार असल्याचे डॉ. आडके यांनी सांगितले. तसेच गडकोटांची भटकंती कशी करावी, कुठे आणि केव्हा भटकावे याचे गिर्यारोहणाचे शास्त्र आणि तंत्र याचे प्रशिक्षणही मैत्रेयतर्फे दिले जाणार असल्याचेही सांगितले. यावेळी उमेश कुंभार, राजेश पाटील, शैलेश भोसले, सी. एस. गुटगट्टे, प्रकाश कुंभार, सुचित हिरेमठ, अशोक करांडे, विश्‍वनाथ भोसले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com