आंबेडकरी विचारांचा जागर मांडणारे तरुण शिलेदार

डॅनियल काळे
शनिवार, 14 एप्रिल 2018

कोल्हापूर - महापुरुषांना केवळ डोक्‍यावर घेऊन नाचून चालणार नाही; तर त्यांचे विचार डोक्‍यात घेऊन समाजपरिवर्तनाच्या कामासाठी कष्ट घेणे हे समाजाला पुढे नेणारे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश खऱ्या अर्थाने जाणून घेऊन त्यानुसार काम करणाऱ्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

कोल्हापूर - महापुरुषांना केवळ डोक्‍यावर घेऊन नाचून चालणार नाही; तर त्यांचे विचार डोक्‍यात घेऊन समाजपरिवर्तनाच्या कामासाठी कष्ट घेणे हे समाजाला पुढे नेणारे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश खऱ्या अर्थाने जाणून घेऊन त्यानुसार काम करणाऱ्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

आंबेडकरी विचारधारेतून परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या व आपल्या परीने त्यासाठी काम करणाऱ्या या तरुणांशी संवाद साधत त्यांचे काम ‘सकाळ’ने जाणून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचाराचा जागर करत हे विद्यार्थी, कार्यकर्ते या महापुरुषांचा विचार घराघरात, समाजात पोचविण्याचा प्रयत्न करत आहेत.

वेगळ्या ‘नामांतरा’ची चळवळ राबवणारा हरिष 

शाहूवाडी तालुक्‍यातील उखळू या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या हरिष कांबळे या तरुणाचे शिक्षण एम. ए. (इतिहास) झाले आहे. तो ऑल इंडिया स्टुडंटस्‌ फेडरेशनचा (एआयएसएफ) कार्यकर्ता आहे. भीमा कोरेगावच्या घटनेनंतर जातीय तेढ कमी करण्याच्या दृष्टीने शाहूवाडी तालुक्‍यात शिवराय-भीमराय सद्‌भावना बाईक रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात पुढाकार घेतला. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर इतक्‍या वर्षांतही सरकारी दफ्तरात दलित वस्त्यांची नोंद महारवाडा, हरिजनवाडा, मांगवाडा अशीच आहे. ही नोंद पुसून त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांची नावे अशा वसाहतीला देण्याची नामांतराची एक नवी चळवळ शाहूवाडी तालुक्‍यात हरिषने सुरू केली आहे. २५ हून अधिक गावात त्यासाठी हरिषचे प्रबोधनाचे काम सुरू आहे. उखळू गावातील डॉ. शामप्रसाद मुखर्जी जन वन योजनेतील गैरव्यवहारही त्याने उघडकीस आणला. त्याचबरोबर तालुका दारूमुक्त करणे, शहीददिनी स्वच्छता मोहीम, पर्यावरणविषयी जागृती निर्माण करणे, अशी कामे सुरू आहेत. 

‘एक घर एक पुस्तक’मधून जागर घडविणारे आरती, धीरज

कोल्हापूरच्या मुक्त सैनिक वसाहतीत राहणाऱ्या मराठा समाजातील आरती रेडेकर सायन्स शाखेतून पदवीधर असून महापुरुषांना जातीत अडकविण्याच्या प्रयत्नांविरोधात लढा देण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नाहीत; पण तरुणाईपर्यंत या महापुरुषांचे हे खरे विचार पोचविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी ‘एक घर एक पुस्तक’ हा उपक्रम राबविला आहे. कन्हैयाकुमार याच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या नावांच्या वाचनालयांचे उद्‌घाटन राजेंद्रनगरात केले.

शहरभरात विविध महापुरुषांच्या नावे अशी दहा वाचनालये सुरू होणार आहेत. त्याची सुरुवात झाली आहे. ‘शिवराय ते भीमराय व्हाया भगतसिंग’ हे पुस्तकही लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे आरतीने सांगितले. 

आरतीसोबतच धीरज कठारीही ‘एक घर एक पुस्तक’ अभियानात काम करतो. मूळचा उस्मानाबादचा असणारा धीरज शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरात स्थायिक झाला आहे. समाजाला पुन्हा विज्ञानवादाकडे आणण्यासाठी कार्य करतो आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांचे विचार लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘एक घर एक पुस्तक’ चळवळीत तो सक्रिय आहे.

Web Title: Kolhapur News Dr Babasaheb Ambedkar birth anniversary special