माणगावला डॉ. बाबासाहेबांचे स्मारक दृष्टिपथात...

सागर कुंभार
शनिवार, 14 एप्रिल 2018

माणगाव परिषदेचे फलित
या ऐतिहासिक परिषदेचे फलित म्हणजे डॉ. बाबासाहेबांसारखे समर्थ नेतृत्व दलित समाजाला मिळाले. कारण १९३९ ला कोल्हापूर येथे दलित प्रजा परिषदेत डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘माझ्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झाली.’’

रुकडी - माणगाव येथे ‘बहुजनांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा, जातीभेद, अज्ञान, अन्याय दूर होऊन समता स्थापन व्हावी’ यासाठी २०, २१ व २२ मार्च १९२० रोजी ही पहिली ऐतिहासिक अस्पृश्‍यता परिषद घेण्यात आली. त्याला ९८ वर्षे पूर्ण झाली. त्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात येणारे स्मारक निधी मंजुरीनंतर दृष्टिपथात आले आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या ‘सामाजिक सुधारणा’ या 
संकल्पनेतून प्रेरित झालेले नाना कांबळे (मास्तर) व तत्कालीन गावकामगार पाटील अप्पासाहेब दादगोंडा पाटील यांच्या संयोजनातून ही अस्पृश्‍यता झाली. या वेळी या परिषदेला राजर्षी शाहू महाराज, कागल संस्थानचे अधिपती बापूसाहेब महाराज, दरबारातील लोक तसेच दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून लोकांनी हजेरी लावली होती. डॉ. बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनातील ही पहिली महत्त्वपूर्ण परिषद ठरली, ती त्यांच्या भाषणाने. या परिषदेत एकूण महत्त्वाचे १५ ठराव सर्वमान्य करण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब यांच्या सहयोगातून साकारलेली ही परिषद अविस्मरणीय ठरली. या परिषदेत विचारमंथन होऊन यासाठी कृतिशील पाऊल टाकण्याचा निर्धारही बाबासाहेबांच्या जीवनात येथूनच  झाला. या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन ग्रामस्थ व बौद्ध समाजातर्फे मार्च १९६३ साली बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण केले, मात्र त्यांचे स्मारक होण्यासाठी सामाजिक व राजकीय पातळीवर १९८६ सालापासून प्रयत्न सुरू आहेत.
स्मारकासाठी आराखडा समिती स्थापन केली होती.

या समितीमध्ये जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सचिव, इतिहास तज्ज्ञ, इतिहास संशोधक व गावातील जाणकार लोकांचा समावेश होता. सध्या शासनाकडून सुमारे अडीच कोटी रुपये मंजूर झाले असून पाहिल्या टप्प्यातील कामास सुरुवात होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

कित्येक वर्षे लाल फितीत अडकलेल्या या समितीच्या प्रस्तावाला यंदा २०१८ मध्ये यश मिळाले. परिषदेचा २०२० ला शताब्दी महोत्सव आहे. तत्पूर्वी हे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा बौद्ध समाजाची आहे.

माणगाव परिषदेचे फलित
या ऐतिहासिक परिषदेचे फलित म्हणजे डॉ. बाबासाहेबांसारखे समर्थ नेतृत्व दलित समाजाला मिळाले. कारण १९३९ ला कोल्हापूर येथे दलित प्रजा परिषदेत डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, ‘‘माझ्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झाली.’’

Web Title: Kolhapur News Dr Babasaheb Ambedkar Jayanti Speical