हिंदू कोड बिल राजर्षी शाहू महाराजांमुळेच - डॉ. भारती पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर - ‘राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी कायदे केले. यात हिंदू कोड बिलाची पायाभरणी केली; म्हणून स्त्रीमुक्तीचे उद्‌गाते व स्त्रीदास्यविमोचक म्हणून शाहू महाराजांचे कार्य मोलाचे आहे,’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. भारती पाटील यांनी येथे केले.

कोल्हापूर - ‘राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी कायदे केले. यात हिंदू कोड बिलाची पायाभरणी केली; म्हणून स्त्रीमुक्तीचे उद्‌गाते व स्त्रीदास्यविमोचक म्हणून शाहू महाराजांचे कार्य मोलाचे आहे,’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. भारती पाटील यांनी येथे केले.

शाहू मेमोरिअल ट्रस्टतर्फे व्याख्यानमालेत राजर्षी शाहू महाराज व स्त्रीदास्यविमोचन विषयावर त्या बोलत होत्या. डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. अशोक चौसाळकर प्रमुख उपस्थित होते.

शाहू महाराजांनी स्त्रीदास्यमुक्तीसाठी केलेले कार्य फारसे उजेडात आले नाही. त्यांच्या कार्याची दखलही घ्यावी लागेल, असे सांगून डॉ. पाटील म्हणाल्या, ‘‘महात्मा फुले दाम्पत्याने स्त्रीशिक्षणाची कवाडे खुली केली. याची जाणीव ठेवून शाहू महाराजांनी स्त्रीशिक्षणाला महत्त्व दिले. शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांचा १९०४ मध्ये देवासच्या तुकोजी महाराजांशी विवाह ठरला; मात्र दोघे विवाहयोग्य वयाचे व्हावेत, तोपर्यंत त्यांनी शिक्षण घ्यावे, असा आग्रह शाहूंनी धरला. यातून महाराजांची शिक्षणविषयक आत्मीयता दिसते.’’

त्या म्हणाल्या, ‘‘मुलींना चांगले शिक्षण देत, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढविणाऱ्या शिक्षकांसाठी प्रोत्साहनपर ५१२ रुपये निधी मंजूर केला. संस्थानातील तीन मुलींना पुण्याच्या हिंगणे आश्रमात शिक्षणासाठी पाठवून त्यांना १२५ रुपये शिष्यवृत्ती सुरू केली. १९२१ मध्ये पुण्यातील ताराबाई वसतिगृहाला १५ हजार निधी दिला. शाहू महाराजांच्या स्नुषा इंदुमतीबाईंना अकाली वैधव्य आले. त्यानंतर त्यांची शाहू महाराजांनी जबाबदारी घेऊन त्यांना सोनतळी येथे शिक्षणासाठी पाठविले. त्यांच्यासोबत अन्य चार मुलीही होत्या. कृष्णाबाई केळवकर यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन आल्यानंतर संस्थानात महिलांसाठी दवाखाना सुरू केला.’’

हिंदू कोड बिलाची पायाभरणी 
महिलांचा छळ होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी त्यांनी १९१९ मध्ये कायदा केला. यात हिंदू कोड बिलाची पायाभरणी तेव्हाच शाहू महाराजांनी केली. यात काडीमोड (घटस्फोट) विषयक कायद्यात तरतुदी केल्या. महिलांच्या छळाचे खटले बंद खोलीत घेण्याची खबरदारीही घेतली. अनौरस मुलांना वडिलांच्या संपत्तीत वाटा दिला. आदी कायदे शाहू महाराजांनी केले, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Dr Bharati Patil comment