पाण्याबरोबर मातीही अडविली पाहिजे.. - डॉ. माधव पोळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

‘पावसाळ्यात पाण्यासोबत माती मोठ्या प्रमाणात वाहून जाते. राज्यातील अनेक धरणे, बंधारे आणि महत्त्वाचे जलस्रोत गाळाने भरले आहेत. या जलस्रोतांचं आयुष्य कमी झाले आहे. परिणामी, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात महापूर येतो, पाणी जमिनीत मुरत नाही; त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते, ही चिंतेची बाब आहे. यासाठी पाण्याबरोबर माती अडविणे गरजेचे आहे,’ असे मत जलतज्ज्ञ डॉ. माधव पोळ यांनी आज व्यक्त केले. ‘सकाळ’च्या कोल्हापूर येथील कार्यालयात झालेल्या ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला.

डॉ. माधव पोळ म्हणाले, ‘‘पाण्याचा बेसुमार उपसा होतो. एकीकडे जमिनीत पाणी मुरत नाही, दुसरीकडे बोअरवेलद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतो. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे ५० टक्के  बाष्पीभवन होते. प्रवाहित किंवा पाटाने दिल्या जाणाऱ्या १५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते, असे एकूण ६५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते. कितीही मोठा पाऊस झाला, तर त्याचा फायदा होत नाही. जलस्रोतातील गाळ काढण्याचे काम हाती घेतल्यास राज्य दुष्काळमुक्त होऊ शकते.’’ 

‘‘यासाठी फक्त पाणीसाठे महत्त्वाचे नाहीत, तर जमिनीत योग्यरीतीने ते मुरवणे गरजेचे आहे. जमिनीत जोपर्यंत पाणी मुरणार नाही, तोपर्यंत दुष्काळ हटणार नाही, अशी परिस्थिती आहे. जमिनीवरच पाण्याचे मोठे साठे करून उपयोग होणार नाही. त्यासाठी जमिनीवर ‘सलग समतल चर’ मारून पाणी जमिनीत मुरवावे लागणार आहे. जेवढ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल तेवढे जलस्रोत सक्षम होतील. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यात ३५० ते ४०० मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे या ठिकाणी जमिनीवर पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याच्या हेतूने काम केले जाते. कापशी येथे लोकांच्या सहभागातून कोजागरी पौर्णिमेला बंधारा बांधला. त्याला कोजागरी बंधारा असे नाव दिले. तसेच सलग समतल चर बांधणी करून उंचावरून येणारे पाणी जमिनीत मुरविल्याने फायदा झाला. 

ज्ञानक्रांती महत्त्वाची
पाणी, शेती, शिक्षण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धाविरोधी चळवळ, सांस्कृतिक वलय टिकविण्यासाठी नेतृत्वविकासाची गरज आहे. नेतृत्वविकास होण्यासाठी ज्ञानक्रांती महत्त्वाची आहे. 

रासायनिक खतांमुळे तहान वाढली  
पूर्वी शेणखत किंवा सेंद्रिय पद्धतीनेच शेती केली जात होती. त्या वेळी पिकांना पाणी कमी लागत होते. आता रासायनिक खतांचा जास्त वापर होत असल्याने पिकांना आग पडल्यासारखी होते. याचा परिणाम म्हणजे पिकांना जास्त पाणी द्यावे लागते. 

देशी वाण आरोग्यदायी
सध्या विविध हायब्रीड धान्य आले आहे. पीक चांगले येते; पण ते किती पौष्टिक आहे, याची खात्री केली पाहिजे. संकरितपेक्षा देशी वाण आरोग्यदायी आहे. त्यामुळे अशा वाणांनाच प्राधान्य दिले पाहिजे.

Web Title: Kolhapur News Dr Madhav Pol Coffee with Sakal