नोकरभरतीच्या निकालापूर्वीच डॉ. मुळे निवृत्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नोकरभरती प्रकरणी माजी कुलसचिव व प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. डी. व्ही. मुळे ‘दोषी की निर्दोष’ याचा निकाल लागण्यापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले.

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नोकरभरती प्रकरणी माजी कुलसचिव व प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. डी. व्ही. मुळे ‘दोषी की निर्दोष’ याचा निकाल लागण्यापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले. एकसदस्यीय समिती व माजी न्यायमूर्तींचा नोकरभरती प्रकरणाचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाला मिळूनही या प्रकरणासंबंधी हालचाल संथ राहिल्याने विद्यापीठ वर्तुळ अवाक्‌ झाले.

विद्यापीठात २०१० ते २०१५ मधील नोकरभरती प्रकरण चांगलेच गाजले. शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे व माजी न्यायमूर्ती जे. एन. शानभाग यांच्या समितीकडून या प्रकरणाची चौकशी झाली. त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला. विद्यापीठ प्रशासनाकडे तो अहवाल आल्यानंतर डॉ. मुळे यांना खुलासा देण्याचा आदेश दिला. दोन-तीन महिन्यांपूर्वी आदेश देऊनही नक्की पुढे त्याचे काय झाले? हा प्रश्‍न गुलदस्त्यातच राहिला. 

अहवाल मिळाल्यानंतर डॉ. मुळे यांना खुलासा देण्याचा आदेश दिला. दरम्यानच्या काळात शासनाचे पत्र आले. डॉ. देशपांडे यांचा अहवाल माजी न्यायमूर्ती शानभाग यांच्याकडे देण्याचा त्यात आदेश होता. त्यानुसार तो शानभाग यांना दिला. आठ दिवसांपूर्वी शानभाग यांच्याकडून तो पुन्हा प्रशासनाला मिळाला. प्रशासनाने पुन्हा डॉ. मुळे यांना खुलासा देण्याबाबत सांगितले. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, त्याचे काम सुरू आहे.
- डॉ. डी. टी. शिर्के,
प्र-कुलगुरू

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा ‘प्रभारी’ कुलगुरूपदाचा कार्यभार सोपविला. त्यामुळे त्यांच्या येरझाऱ्या मुंबई विद्यापीठाकडे वाढल्या. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सूत्रे सोपवून त्यांनी मुंबई विद्यापीठातील गोंधळ कमी करण्याकडे लक्ष घातले.

मुंबई विद्यापीठाचा निकाल लावण्याची जबाबदारी शिवाजी विद्यापीठाकडे सोपविली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर तरी डॉ. शिंदे यांच्याकडून अहवालाबाबत कोणती पावले उचलण्यात येणार, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागून होते. 

डॉ. मुळे यांना खुलासा देण्याची वार्ता विद्यापीठ वर्तुळात पसरल्यानंतर हे प्रकरण सोपे नाही, हे विद्यापीठ अभ्यासकांच्या लक्षात आले. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले. या स्थितीत डॉ. मुळे यांचे सेवानिवृत्तीचे दिवस जवळ येत गेले. ते सेवानिवृत्त होण्यापूर्वीच पुढील पावले प्रशासन उचलेल, असा अंदाज व्यक्त होत राहिला.

Web Title: Kolhapur News Dr Mule retired