मंत्रालयास २७ मार्चला घेराओ - डॉ. एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

कोल्हापूर - कृषी पंपाची वीज तसेच पाणीपट्टी दरवाढीविरोधात येत्या २७ मार्चला मंत्रालयाला घेराओ घातला जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऐन उन्हाळ्यात शेतीची वीज तोडली तर शेतकऱ्यांना दिवसा चांदण्या दिसतील. ती वेळ येऊ नये, यासाठी मानवी साखळी होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर - कृषी पंपाची वीज तसेच पाणीपट्टी दरवाढीविरोधात येत्या २७ मार्चला मंत्रालयाला घेराओ घातला जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऐन उन्हाळ्यात शेतीची वीज तोडली तर शेतकऱ्यांना दिवसा चांदण्या दिसतील. ती वेळ येऊ नये, यासाठी मानवी साखळी होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘सर्वाधिक वीज दरवाढ शेतीपंप वीज ग्राहक व सहकारी पाणी संस्थांवर लावली आहे. एक रुपया ९७ पैसे युनिट, त्यावर इंधन अधिभार, डिमांड चार्जेस व अन्य चार्जेस याप्रमाणे बिले भरावी लागणार आहेत. वीज दरवाढ दुप्पट ते तिप्पट होणार आहे. एच. टी. वीज ग्राहकांच्या कृषी पंपाच्या अन्यायी दरवाढीविरोधात आंदोलन होत आहे.’’

जून २०१६ ते मार्च २०२० अखेर एक रुपये सोळा पैसे प्रतियुनिट दर लावण्याचे आश्‍वासन ‘महावितरण’ने दिले होते. ते न पाळल्याने घेराव घालण्याचा निर्धार केला आहे. महावितरणने १ रुपया ९७ प्रतियुनिटप्रमाणे वसुली सुरू केली आहे. सरकारी पाणीपट्टीत २० टक्‍क्‍यांची दरवाढ केली आहे. ती परवडणारी नाही.
- ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील

ते म्हणाले, ‘‘कृषी पंपास जलमापक यंत्र बसवून घनमीटर पद्धतीने पाणी वापराबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पाणी वापर संस्थांना जलमापक यंत्रे बसविणे ते चालविणे ही बाब क्‍लिष्ट आहे. असे प्रयोग शासनाने स्वखर्चातून करावेत. महावितरणकडून एलटी एचटी विद्युत मीटर बसविली असून ती कार्यरत आहेत. एनर्जी चार्जेसबरोबर वेगळा इंधन आकार ज्याप्रमाणे बिलात सिंचन आकार या कलमाखाली आकारणी करावी. यामुळे वसुली शंभर टक्के होण्यास मदत होईल.

राज्यातील ४० लाख कृषी पंप ग्राहकांना वीज मीटर बसविलेली नाहीत. त्यासाठी महावितरणकडे निधी नाही. जलमापक यंत्रे बसविणे, त्याची देखभाल दुरुस्तीचे काय याचे उत्तर पाटबंधारेकडे नाही. शेतकऱ्यांनी कर्जे काढून पाण्याची व्यवस्था केली.’’

बाबासाहेब पाटील भुयेकर, वीज अभ्यासक प्रताप होगाडे, आर. जी. तांबे-कराड, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, एस. ए. कुलकर्णी, रणजित जाधव, आर. के. पाटील, सखाराम पाटील, मारुती पाटील, महादेव सुतार, अरुण लाड आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Dr N D Patil comment