विकसित प्रदेशांत शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब - डॉ. सांगवान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

कोल्हापूर - ‘कृषी पतपुरवठा मोठ्या प्रमाणात होताना आणि काही राज्यांत कर्जमाफीही दिलेली असताना विकसित प्रदेशांतही शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होणे, ही चिंतेची बाब आहे,’ असे प्रतिपादन चंदीगडच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया अध्यासनाचे प्रा. डॉ. एस. एस. सांगवान यांनी केले.

कोल्हापूर - ‘कृषी पतपुरवठा मोठ्या प्रमाणात होताना आणि काही राज्यांत कर्जमाफीही दिलेली असताना विकसित प्रदेशांतही शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होणे, ही चिंतेची बाब आहे,’ असे प्रतिपादन चंदीगडच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया अध्यासनाचे प्रा. डॉ. एस. एस. सांगवान यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दि युनायटेड वेस्टर्न बॅंकेच्या कै. आर. एन. गोडबोले अध्यासनातर्फे ‘ग्रामीण पतपुरवठ्याचा बदलता दृष्टिकोन आणि ग्रामीण गरिबांचे वित्तीय समावेशन’ या विषयावर आर. एन. गोडबोले स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. एम. गुरव अध्यक्षस्थानी होते.

डॉ. सांगवान म्हणाले, ‘‘बॅंकांनी दिलेल्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करत आहेत, यात आपले काय चुकले हे शोधले पाहिजे. गुंतवणूक पतपुरवठ्याचे प्रमाण कमी होत आहे आणि उत्पादन पतपुरवठ्याचे प्रमाण वाढत आहे. काही राज्यांत कर्जमाफी देऊनही परिस्थिती सुधारली नाही. ज्यांचा बॅंकेशी संबंध नव्हता त्याची मोठ्या प्रमाणात बॅंक खाती उघडली गेली आहेत, पण त्यांच्या पतपुरवठ्याच्या गरजा बॅंक पूर्ण करू शकत नाहीत, त्याकडे लक्ष द्यावे लागेल. १९७५ मध्ये विभागीय ग्रामीण बॅंकांची सुरवात झाली.’’ 

वाढत्या पतपुरवठ्यामुळे राजकीयदृष्ट्या दिल्या गेलेल्या कर्जमाफीच्या योजना, यामुळे शेती व ग्रामीण क्षेत्रातील पत व्यवस्थेत वातावरण गढूळ बनले व परतफेडीवर परिणाम होऊ लागला. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात पतपुरवठा करताना बॅंका हात आखडता घेतील व त्यामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा.(डॉ.) ए. एम. गुरव यांनी ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात अधिक गुंतवणूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली. अध्यासनप्रमुख प्रा. (डॉ.) एस. एस. महाजन यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. के. व्ही. मारुलकर यांनी आभारप्रदर्शन व सूत्रसंचालन केले. या वेळी  डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. व्ही. एस. पाटील, डॉ. श्‍यामसुंदर मिरजकर, डॉ. सागर वाळवेकर, डॉ. अनिकेत जाधव, डॉ. अमर जाधव, डॉ. एस. डी. कोरे, श्री. बी. टी. नाईक. डॉ. गिरीगोसावी हे उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Dr S S Sangvan comment