शिरोळमधील नद्यांचे पाणी विषारी - डॉ. शंकरगौडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

कोल्हापूर - शिरोळ तालुक्‍यातील पंचगंगा, दूधगंगा, कृष्णा आदी नद्यांच्या पाण्यात माणसांनाच नव्हे तर शेतीलाही अपायकारक करणारे विषारी घटक सापडले आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन रायचूरच्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर सायन्सचे डायरेक्‍टर ऑफ रिसर्च डॉ. शंकरगौडा यांनी केले.

कोल्हापूर - शिरोळ तालुक्‍यातील पंचगंगा, दूधगंगा, कृष्णा आदी नद्यांच्या पाण्यात माणसांनाच नव्हे तर शेतीलाही अपायकारक करणारे विषारी घटक सापडले आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन रायचूरच्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर सायन्सचे डायरेक्‍टर ऑफ रिसर्च डॉ. शंकरगौडा यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कीटक विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. भिमाण्णा, या सर्वेक्षण प्रकल्पाचे समन्वयक कर्करोग तज्ज्ञ डॉ. आशितोष पाटील उपस्थित होते.

डॉ. शंकरगौडा म्हणाले, ‘‘शिरोळ तालुक्‍यात कर्करोगाचे प्रमाण 
वाढल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आमच्याशी संपर्क साधून संशोधन करण्याची मागणी केली. त्यानुसार तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा नदीतील पाण्याचे कोथळी, दत्तवाड, नांदणी, राजापूर येथून आठ नमुने घेतले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासल्यानंतर त्यातील ५ नमुने दूषित आढळले. मानवी आरोग्याला घातक असणारे झिंक, शिसम, अर्सेनिक व लिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात या पाण्यात मिसळले असल्याने हे पाणी पिण्यासह शेतीलाही घातक आहे.’’

पत्रकार परिषदेस शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सावकार मादनाईक, रमेश भोजकर, सागर शंभूशेटे आदी उपस्थित होते.

प्रतिकारशक्‍तीला मारक - डॉ. शंकरगौडा
डॉ. शंकरगौडा म्हणाले, ‘‘भाजीपाल्याचे ३०० नमुने घेतले. त्यामध्ये कोबी, ढबू मिरची, वांगी, पालक आदींचा समावेश होता. या फळ व भाजीपाला पिकांवर क्‍लोरोपायरीफॉस (आंतरप्रवाही) गटातील विविध कीटकनाशकांचा प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात वापर केल्याचे स्पष्ट झाले. औषधाची जेवढी मात्र देणे आवश्‍यक होते त्यापेक्षा कितीतरी पट जादा फवारणी शेतकरी करत आहेत. ही औषधे भाजीपाल्याच्या माध्यमातून शरीरात गेल्यास प्रतिकारशक्‍ती कमी होते. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. शेतकऱ्यांना या कीटकनाशकांचा वापर किती प्रमाणात करावा, याची माहिती नसल्यामुळे असे होत असावे.’’

...तर भाजीपाला पिकवणार नाही - मादनाईक 
शिरोळ तालुक्‍यात भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारल्याने कर्करोग होत असल्याचे सांगण्यात येते; मात्र रोगराईची नेमकी कारणे समोर येण्यासाठीच हे संशोधन सुरू आहे. जर खरंच भाजीपाल्यामुळे कर्करोग होत असेल तर नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रसंगी तालुक्‍यातून भाजीपाला पिकवणे बंद केले जाईल’’, अशी भूमिका सावकर मादनाईक यांनी स्पष्ट केली.

Web Title: Kolhapur News Dr ShankarGouda comment