‘शुद्ध’च्या नावाखाली ‘अशुद्ध’ पाणी विक्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कोल्हापूर - शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी ग्राहकांच्या माथी मारले जाते. त्याच्या विरोधात आता कोल्हापूर जिल्हा पॅकेजिंग, ड्रिंकिंग वॉटर असोसिएशननेच पुढाकार घेऊन हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

कोल्हापूर - शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी ग्राहकांच्या माथी मारले जाते. त्याच्या विरोधात आता कोल्हापूर जिल्हा पॅकेजिंग, ड्रिंकिंग वॉटर असोसिएशननेच पुढाकार घेऊन हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अन्न व औषध प्रशासनानेही ठिकठिकाणी छापे टाकून आयएसआय आणि प्रमाणित नसलेल्या शुद्ध पाण्याच्या उत्पादनावर बंदी घालण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र ‘आयएसआय’ ब्रॅंड आहे की नाही, हे कोण पहातो?

प्रकृती जपण्यासाठी पर्यटकच काय, तर अनेकजण शुद्ध पाण्याच्या बॉटल, कॅन प्रवासांत आणि कार्यालयात वापरतात. मात्र हे पाणी खरोखरच शुद्ध आहे का, याची माहिती संबंधित ग्राहकाला दिली जात नाही. स्वस्तात मस्त म्हणून अनेकांकडे शुद्ध पाण्याचे कॅन कार्यालयात दिसतात. प्रत्यक्षात शुद्ध पाणी देण्यासाठी त्याला लागणारी लॅबोरेटरी टेस्ट, त्याचे प्रमाण, ‘आयएसआय’चा मार्क हे आवश्‍यक असते. यासाठी ‘फूड ॲंड ड्रग’ विभागाची परवानगी घ्यावी लागते. वार्षिक परवाना शुल्क, नूतनीकरण शुल्क यांसह इतर शुल्क सरकारला भरावे लागते. 
असे असतानाही प्रत्यक्षात शुद्ध पाण्यासाठीचे अनेक प्लॅंट शहर आणि परिसरात विनापरवाना सुरू आहेत. त्याकडे फूड ॲंड ड्रग विभागाची जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्याचा आरोप अधिकृत व्यवसायिकांनी केला आहे. परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्यांनाच विभागाकडून धारेवर धरले जाते आणि प्रत्यक्षात विनापरवाना व्यवसायांना मात्र मोकाट सोडले जात असल्याचे दिसते. 

दृष्टिक्षेपात...

  •  जिल्ह्यात अधिकृत व्यावसायिक २६

  •  सरकारी नियमानुसार ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचे शुल्क भरावे

  •  दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक परवाना फी प्रत्येक जण भरतो

  •  ‘व्हीआयएस’ नियमानुसार लॅबोरेटरीच्या तपासण्या

  •  सर्व रिपोर्ट बीआयएसचे अंडर पाहिले जातात

  •  ‘आयएसआय’ मानांकित व ‘आयएसआय’ सर्टिफाईट ड्रिंकिंग वॉटरची विक्री आवश्‍यक

शहर परिसरात ५४ हून अधिक अनधिकृत शुद्ध पाण्याचे प्लॅंट आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. अनधिकृत शुद्ध पाण्याचे प्लॅंट बंद झाल्यास ग्राहकांना शुद्ध पाणी मिळेल. अनधिकृत प्लॅंट कोठे आहेत, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांसह अन्न व औषध प्रशासनाला दिली आहे. तरीही कारवाई होत नाही. ग्राहक विकत बाटलीबंद आणि कॅनमध्ये पाणी घेत आहेत. त्यांना शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी आमची आहे. मात्र ‘आयएसआय’ मार्क नसलेले आणि अनधिकृत विक्रेत्यांमुळे ग्राहकांच्या माथी दूषित पाणी मारले जात आहे.
- अरुण भोसले, 

  अध्यक्ष, जिल्हा पॅकेजिंग, ड्रिंकिंग वॉटर असोसिएशन

दरम्यान, फूड ॲंड ड्रगच्या अधिकाऱ्यांनीही चार दिवसांपूर्वीच हालोंडी-हातकणंगले परिसरातील ‘मे. प्राईम ॲक्वा’ या ब्रॅंडच्या बेकायदेशीर उत्पादन केलेल्या २० लिटर पाण्याचे कॅन जप्त केले. साधारण सोळा हजार ८४० रुपयांचा ऐवज जप्त केला.
या कंपनीने पॅकबंद पाण्याचे उत्पादन करण्यासाठी एफ. एस. एस. ए. आय. परवाना व बी. बी. आय. एस. प्रमाण व पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे उत्पादन केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. यासाठी कारखाना सील केला. सहायक आयुक्त (अन्न) सुकुमार चौगुले यांनी ही कारवाई केली. प्रत्यक्षात कायमस्वरूपी शहर व जिल्ह्यातील सर्व अनधिकृत शुद्ध पाण्याचे प्लॅन्ट बंद झाले पाहिजेत, अशी मागणी जिल्ह्यातील अधिकृत व्यवसाय करणाऱ्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटर सप्लायर्स यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

 

Web Title: Kolhapur News Drinking water bottle issue