यंत्रच करणार बनावट सोन्याचा पर्दाफाश

सुधाकर काशीद
बुधवार, 20 जून 2018

कोल्हापूर - सोने कर्ज तारण प्रकरणातील बनावट सोन्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सर्वच सोने तारण प्रकरणातील सोन्याची शुद्धता तपासणार आहे आणि या तपासणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहे.

कोल्हापूर - सोने कर्ज तारण प्रकरणातील बनावट सोन्याची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सर्वच सोने तारण प्रकरणातील सोन्याची शुद्धता तपासणार आहे आणि या तपासणीसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहे. सोन्याची शुद्धता तपासणारी यंत्रे त्यासाठी घेण्यात येणार आहेत. या यंत्रात सोन्याचा अलंकार ठेवला की ते यंत्र सोन्याची नेमकी शुद्धता दाखवते. शहरातील काही सराफी दुकानात अशा यंत्राचा वापर सुरू आहे. 

सोनेतारण कर्ज व अडीअडचणीच्या काळात अर्थसाह्यासाठी एक चांगला मार्ग आहे. बहुतेक बॅंका व पतसंस्थांत सोनेतारण कर्जाची सुविधा आहे. तारण ठेवलेल्या सोन्याची नेमकी शुद्धता, त्याचे आजचे बाजारभावाप्रमाणे मूल्य काढण्यासाठी सध्या व्हॅल्युएटरची मदत घेतली जाते. हा व्हॅल्युएटर सोने पारखून त्याचे मूल्य ठरवतो. बॅंक, पतसंस्था व्यवस्थापक, व्हॅल्युएटर व कर्जदार यांच्या समक्ष हा व्यवहार होतो; पण या व्यवहारात अपप्रवृत्ती आल्या व बनावट सोन्याला खऱ्या सोन्याचे लेबल लावून त्यावर आपल्या मर्जीतल्या लोकांना कर्ज देण्याचे प्रकार घडले किंवा जे खातेदार शक्‍यतो कर्ज काढायच्या भानगडीत पडत नाहीत, त्यांच्या नावावर व्यवस्थापक व व्हॅल्युएटर यांच्या संगनमताने कर्ज उचलले व कालांतराने हे घोटाळे उघडकीस आले. हे फक्त जिल्हा बॅंकेतच घडले, असे नाही. अनेक बॅंका, पतसंस्थांत असे प्रकार घडलेत. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत मात्र असे प्रकार पाठोपाठ घडल्याने व ही बॅंक जिल्ह्याची अर्थवाहिनी असल्याने व्यवस्थापनाने ताकही फुंकून पिण्याची आता भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोनेतारण कर्ज म्हणून बॅंकेच्या विविध शाखांकडे असलेल्या व सीलबंद अवस्थेत असलेल्या सर्व दागिन्यांची शुद्धता तपासणी केली जाणार आहे. अर्थात हे काम हाताने करायचे झाल्यास त्यात खूप वेळ जाणार आहे आणि पुन्हा हाताने केलेल्या कामाच्या विश्‍वासाहर्तेचाही मुद्दा उपस्थित होणार आहे. त्यामुळे सोने शुद्धता तपासणी करण्यासाठी बॅंक यंत्रच खरेदी करणार आहे.

त्यासाठी देशातील नामवंत व आधुनिक यंत्र उत्पादकांकडून निविदाही मागवल्या आहेत. त्यामुळे हे मशीन बनावट सोन्याबरोबरच बनावट वृत्तीच्या काही बॅंक पतसंस्थांचे व्यवस्थापक, कर्मचारी, काही ठराविक व्हॅल्युएटर यांचा पर्दाफाश करणारे ठरणार आहे. 

इरिडियम धातूचेही प्रमाण कळते
सोन्याची शुद्धता मोजणाऱ्या या यंत्राला कॅरेट मीटर किंवा स्पेक्‍ट्रोमीटर म्हणतात. हे यंत्र सोन्याच्या अलंकारात शुद्ध सोने किती व अन्य घटक किती, याची माहिती देते. अलीकडे निघालेल्या यंत्रात तर इरिडियम या धातूचेही प्रमाण कळते. या पूर्वीच्या यंत्रात इरिडियमचे प्रमाण कळत नव्हते.

Web Title: Kolhapur News duplicate Gold checking Machine