असह्य उकाड्यातही एका घरात नांदतो थंडावा...

सुधाकर काशीद
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

छतावर स्लॅबऐवजी कौले आहेत आणि भिंत बांधताना सिंमेंट-वाळूचा केलेला वापर वगळता अन्य कोठेही सिमेंटचा वापर नाही. म्हणून या घरात तळपत्या उन्हातही शांत थंडावा आहे. हे घर रंकाळ्याजवळ हरीओमनगरात आहे आणि घरच बांधणार असाल तर असं साधं, सुंदर, आरोग्यदायी घर तुम्हीही बांधा, अशी या घराचे मालक किशोर देशपांडे यांची विनंती आहे.​

कोल्हापूर - काल दुपारी साडेबारा वाजता ऊन चांगलेच रणरणत होते. उष्णता मापकानुसार उन्हाची तीव्रता ४०.५ सेल्सियस होती. उन्हाबरोबरच त्याला दमटपणाचीही जोड होती. घराघरात पंखे भिंगरीसारखे फिरत होते; पण एका घरात मात्र पंखा फिरत नव्हता. कुलर गार हवेचे झोत सोडत नव्हता, तरीही या घरात थंडावाच जाणवत होता. उष्णता मापकाच्या आधारे सांगायचं झालं, तर या घराच्या तळमजल्यावर २९ व पहिल्या मजल्यावर ३३ सेल्सियस अंश इतके तापमान होते. म्हणजेच रस्त्यावरच्या तापमानात आणि घरातल्या तापमानात १० सेल्सियसचा फरक होता.

याला कारण एकच, ते म्हणजे या घराच्या भिंतीला पांढरी माती व शेणाचा गिलावा आहे. घरात कोठे फरशीचा एक तुकडा नाही. जमीन शेण व पांढऱ्या मातीने सारवून गुळगुळीत केलेली. छतावर स्लॅबऐवजी कौले आहेत आणि भिंत बांधताना सिंमेंट-वाळूचा केलेला वापर वगळता अन्य कोठेही सिमेंटचा वापर नाही. म्हणून या घरात तळपत्या उन्हातही शांत थंडावा आहे. हे घर रंकाळ्याजवळ हरीओमनगरात आहे आणि घरच बांधणार असाल तर असं साधं, सुंदर, आरोग्यदायी घर तुम्हीही बांधा, अशी या घराचे मालक किशोर देशपांडे यांची विनंती आहे.

माझ्या घरातला थंडावा एकदा अनुभवायला याच
राहुल देशपांडे म्हणाले, ‘‘पांढरी माती व शेणावर पावसाळ्यात काहीही परिणाम होत नाही. फरशी नसल्याने ती रोज पुसायचा प्रश्‍नच येत नाही. पंधरा दिवसांतून एकदा जमिनी सारवल्या की, त्याकडे पुन्हा बघावे लागत नाही. सारवलेल्या जमिनीवर कोपऱ्यात छोटीशी रांगोळी घातली की, त्याची सर किमती गालिच्यालाही येत नाही आणि उन्हाळ्यातला माझ्या घरातला थंडावा अनुभवण्यास पूर्वचर्चा करून कोणीही आल्यास माझी हरकत राहणार नाही.’’ 

उन्हाचा तडाखा, घराघरातला उकाडा या सर्व वातावरणाकडे त्रस्त झालेले शहर या पार्श्‍वभूमीवर राहुल देशपांडे यांनी मुद्दाम आपल्या घरातल्या थंडाव्याची माहिती लोकांपुढे आणली. ते म्हणाले, ‘‘सात वर्षांपूर्वी हरीओमनगरात मी हे घर बांधले. त्यासाठी फार अभ्यास केला, असे काही नाही. आपल्याकडे ग्रामीण भागात, कोकणात, धनगरवाड्यांवर घर बांधताना घेतल्या जाणाऱ्या तंत्राची माहिती घेतली. घर बांधणीत नैसर्गिक घटकाला प्राधान्य देण्याचे ठरवले.

त्यानुसार काही ठिकाणी चिरा, काही ठिकाणी वीट भिंतीसाठी वापरली. भिंत उभारताना फक्‍त सिमेंट-वाळूचा वापर केला. त्यानंतर भिंतीवर पांढरी माती व शेणाचा गिलावा केला. जमिनीही मातीच्याच ठेवल्या. त्या शेणाने सारवून घेतल्या. दोन मजल्यात स्लॅब न टाकता लाकडी फळ्या टाकल्या. छतावर मंगलोरी कौले ठेवली. घराला समोरासमोर खिडक्‍या ठेवल्या, जे शास्त्र तिसरी-चौथीला असताना पुस्तकात वाचले होते. घरात दोन पंखे बसवले, जे सारवलेली जमीन सुकी होण्यासाठी उपयोगी ठरते. अशा बांधणीमुळे घर बांधणीच्या खर्चात नक्‍कीच कपात झाली; पण पांढरी माती व शेणाच्या या घरात एक थंडावा, सारवलेल्या शेणाचा मंद वास, भरपूर प्रकाश यामुळे वेगळीच वातावरणनिर्मिती झाली. उन्हाळ्यात थंड आणि हिवाळा-पावसाळ्यात छानशी ऊब जाणवू लागली. 

Web Title: Kolhapur News Eco friendly House special

टॅग्स