शैक्षणिक कर्ज सरसकट माफ करा: आमदार सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

स्टुडंट युनियनची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

स्टुडंट युनियनची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज सरसकट माफ व्हावे, केजी टू पीजी सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत मिळावे, शिक्षणावर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या कमीत कमी सहा टक्के खर्च करावा व महाविद्यालयातून उत्तीर्ण होऊन बाहेर पडताना प्रत्येकाला रोजगाराची व्यवस्था करावी, त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि गुंतवणूक वाढवावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी आज केली. कोल्हापूर सिटी नॅशनल स्टुडंट युनियनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शने करून शासनाच्या शैक्षणिक आणि रोजगारनिर्मितीच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, की सरकार शिक्षणाचा बाजार मांडत आहे. विद्यार्थी, युवकांची दिशाभूल करीत आहे. तीन वर्षांपूर्वी प्रत्येकाला रोजगार देणार, अशी घोषणा करून तरुणांची दिशाभूल केली आहे. रोजगार मिळेल, या आशेवर कोट्यवधी विद्यार्थांनी कर्ज घेऊन शिक्षण घेतले. मात्र, शिक्षणासाठी शून्य टक्के कर्ज देण्याची घोषणा करूनही बॅंकांनी संबंधित विद्यार्थांकडून 10 ते 12 टक्के व्याज आकारणी केली आहे. एकीकडे चांगले शिक्षण घ्या, असे सांगून नोकरी देतो म्हणायचे आणि दुसरीकडे नोकरीही नाही व शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज आकारणीही करायची, हे चुकीचे आहे. सध्या तरुणांना चांगले शिक्षणही घेता येत नाही आणि नोकरीही नाही, अशी स्थिती आहे. शासनाने आपल्या धोरणात बदल करावा, अन्यथा स्टुडंट युनियनतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल. दरम्यान, युनियनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी "एनएसयूआय'चे शहराध्यक्ष पार्थ मुंडे, दीपक थोरात, उदय पोवार, अजिंक्‍य पाटील, सुप्रिया भोसले, प्रियांका कांबळे, पूजा सोनार, स्नेहा वायचळ, क्रांतीकुमार पाटील, इंद्रजित पाटील, संकेत सावंत उपस्थित होते.

व्याज वसुली सुरूच
शासनाने शैक्षणिक कर्ज शून्य टक्के व्याजाने देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार शैक्षणिक कर्ज घेतले. मात्र, बॅंकांनी आता आमच्याकडून व्याजवसुली सुरू केली असल्याची तक्रारही प्रियांका कांबळे यांनी या वेळी केली.

Web Title: kolhapur news education loan and satej patil