वेळवट्टीत हत्तीचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

आजरा - आठवडाभर वेळवट्टी (ता. आजरा) शिवारात मुक्काम ठोकलेल्या हत्तीने धुडगूस घातला आहे. नुकसानीचे सत्र सतत सुरू असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. सलग तीन दिवस शिवाजी मानाप्पा गोरे यांच्या शेतात हत्तीने धुमाकूळ घालून भात व ऊस उद्‌ध्वस्त केला. त्याच्या वावराने शेतशिवार ओस पडले आहे.

चाळोबा जंगलातून दररोज सायंकाळी हत्ती शिवारात उतरतो. त्याने भाताची केलेली लावण व उसाचे उभे पीक उद्‌ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. शिवाजी गोरे यांच्या दोन एकरांपैकी दहा गुंठ्यांतील ऊस फस्त केला आहे. पाच गुंठ्यांतील भाताची रोप लावण तुडवून टाकली आहे. शेतीवर गुजराण करणाऱ्या गोरे कुटुंबाची वर्षभराची पोटगी गमावण्याची वेळ आली आहे. या कुटुंबाचा जगण्याचा प्रश्‍न असून शेतातील पीकच हत्ती फस्त करणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे. तोकड्या मिळणाऱ्या भरपाईत वर्षभराची बेगमी होणार का, असा सवाल रवींद्र गोरे यांनी उपस्थित केला. हत्ती भुदरगड-राधानगरीकडे गेला असल्याचे वन विभाग सांगते. मग नेमके हत्ती किती हाही प्रश्‍न आहेच.

हत्तीमुळे गव्यांचे फावते....!
हत्तीच्या भीतीने शेतकऱ्यांनी राखण सोडली आहे. याचा फायदा गव्यांचे कळप उचलत आहेत. दोन दिवसांपूर्वी सोहाळे येथे गव्यांच्या कळपाने धोंडिबा कळेकर, मारुती कळेकर यांचे भात तरवे फस्त केले. मसोली येथील मारुती कांबळे यांच्या शेतातील तरवे गव्यांच्या कळपाने तुडवून नुकसान केले आहे.

Web Title: kolhapur news elephant