भुदरगड तालुक्‍यातील भटवाडी परिसरात हत्तींचा कळप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

कडगाव -  भुदरगड तालुक्‍यातील भटवाडी परिसरात तळ ठोकलेला हत्तींचा कळप काल (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या गस्ती पथकास दिसला. कळपामध्ये एक नर हत्ती, दोन माद्या व दोन पिल्ले असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, हत्तींमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनक्षेत्रपाल संदेश पाटील, वनपाल ए. बी. वसवाडे, वनरक्षक एस. एस. जितकर, वनमजूर विठोबा निरुकेकर गस्त घालत असताना प्रथमच भटवाडीनजीक कालापूर जंगलात हत्तींचा कळप दिसला. वन विभागाचे गस्ती पथक हत्तीच्या मागावर आहे. नागरिकांनी या परिसरातील जंगलात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. पाटगाव परिसरात २ मार्चला हत्तींचा कळप आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.

हत्तींनी परिसरात केळी, ऊस, नारळ, बांबू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याबाबत पाच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून वन विभागाने अहवाल सादर केला आहे. सध्या हत्तीचे वास्तव्य भटवाडीनजीक कालापूरच्या जंगलात आहे. पाटगाव येथील मौनी सागर प्रकल्पाचे मुबलक पाणी या भागात असल्याने हत्तींनी या परिसरात तळ ठोकला आहे. 

खबरदारी म्हणून कालापूर येथे वास्तव्यास असणाऱ्या सखाराम लाड या शेतकऱ्याचे भटवाडी येथे स्थलांतर केले आहे. दरम्यान, रांगणा गडाकडे जाणाऱ्या पर्यटकांनी तसेच शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, हत्तीचे दर्शन झाल्यास फटाके वाजवू नये, हत्तीचे दर्शन झाल्यास वन विभागाच्या गस्ती पथकास सांगण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

Web Title: Kolhapur News Elephant in Bhatwadi region