गव्यांच्या अभयारण्यात आता हत्तीची भर 

सुधाकर काशिद
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

हत्ती अभयारण्यात जाणाऱ्या मार्गात कधीही येऊ शकतो, म्हणून अभयारण्यात येणारे मार्ग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद केले. अभयारण्यात पर्यटकांची खूप वर्दळ असते व त्या वाटेवरच त्याचा वापर असल्याने दुर्घटना नको,म्हणून ही खबरदारी घेतली. 

कोल्हापूर -  गव्यांसाठी असलेल्या दाजीपूर अभयारण्य परिसरात काही कालावधीसाठी तरी एका जंगली हत्तींची भर पडली. हा हत्ती गेले पंधरा दिवस मानखेट परिसरात होता, तोच आता अभयारण्याला लागूनच असलेल्या डिगस गावात पोहोचला. डिगस हा अभयारण्याचाच एक घटक आहे. त्यामुळे तो हत्ती अभयारण्यात जाणाऱ्या मार्गात कधीही येऊ शकतो, म्हणून अभयारण्यात येणारे मार्ग अनिश्‍चित कालावधीसाठी बंद केले. अभयारण्यात पर्यटकांची खूप वर्दळ असते व त्या वाटेवरच त्याचा वापर असल्याने दुर्घटना नको,म्हणून ही खबरदारी घेतली. 

दरम्यान हा हत्ती भुदरगड, वाकीघोल परिसराकडे परत जाण्याची शक्‍यता आहे. मात्र मानबेट,गगनबावडा येताना हा हत्ती चक्‍क राधानगरी जलाशयातून पोहत आला होता. अर्थात त्यावेळी उन्हाळा होता. जलाशयात पातळी कमी होती. आता मात्र राधानगरी परत वाकीघोल, भुदरगडकडे जाईल की, नाही हीच वन विभागाला शंका आहे. या क्षणी हत्ती जलाशयाला लागूनच असलेल्या डिगस गावात आहे. काल रात्री एका भाताच्या खळ्यावर तो लोकांना दिसलाही आहे. 

हा हत्ती गेले तीन महिने गगनबावडा परिसरात होता. दिपावलीपूर्वी दोन तीन दिवस तो मानबेटच्या धनगरवाड्यात आला. या धनगरवाड्यात गावडे यांची दोनच घरे आहेत.या दोन घरातील सात लोकांशिवाय येथे अन्य लोकांचा वावर नाही. तेथे पोटरीला आलेले भात, केळी, नाचणे हे खाद्य व भरपूर पाणी हत्तीला मिळाला. या शिवाय दिवसभर विसाव्यासाठी जंगलही मिळाले. त्यामुळे दिवसभर निवांत असलेला हा हत्ती दिवस मावळला की मानबेटच्या धनगरवाड्यांकडे हमखास यायचा. खोपटाच्या बाहेरील भागाचे व पिकांचे नुकसान करायचा.

पहिल्या दोन दिवसात हत्ती खोपटाच्या दारात आला म्हणून श्रद्धेने या धनगर कुटुंबानी त्याच्या पावलाच्या ठशाची पूजा केली. मात्र नंतर रोजच दारात हत्ती येवू लागला व आक्रमक होत भितीदायक वातावरण करत राहिला. या ठिकाणी रहाणाऱ्या कुटुंबातील महिला रात्री अन्यत्र निवाऱ्यासाठी जाऊ लागल्या व पुरुष मंडळीवर रात्रभर जागे रहाण्याची वेळ आली. या हत्तीने या परिसरातील शेतकऱ्यांचे भात जेवढे खाल्ले त्या पेक्षा तुडवून अधिक नुकसान केले. 

आज हत्ती मानबेट परिसरातून दाजीपूर अभयारण्यालगतच डिगस गावात पोहोचल्याचे स्पष्ट आहे. वनसंपदेच्या दृष्टीने हत्तीचा वावर चांगला आहे. हत्तीला रहाण्यासाठी हा जंगली भाग पोषिक असल्याचे हत्तीच्या तीन महिन्याच्या वास्तव्यावरून स्पष्ट झाले. पण हा एकटा फिरणारा टस्कर हत्ती आक्रमक आहे. शेतीचे नुकसान करतो आहे. दिवस मावळला की त्याचा वावर सुरू होतो आणि त्याचवेळी त्याच्या भितीने या परिसरातील लोकांचा वावर थांबतो. खोपटाच्या दरवाजा बंद करावा लागतो व रात्रभर जागे राहून हत्तीच्या हालचालींचा अंदाज घ्यावा लागतो, अशी परिस्थिती आहे. 

दाट झाडीमुळे मोहिमेला अडचण 
वन विभागाने हत्तीला परतावले पाहिजे हे ठिक आहे. पण राधानगरी, गगनबावडा परिसरातील जंगल दाट आहे. हत्तीला दडण्यासाठी खूप झाडी आहे. त्यामुळे तेच हत्तीला हटवण्यासाठी मोहिम राबवता येत नाही. 

हत्तीच्या आक्रमकपणाचा धोका गृहित धरून अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी बंद केल्या. वनरक्षक, वनमजुर हत्तीच्या मागावर आहेत. तो राधानगरी जलाशय पार करून पलिकडे गेलाच तर वाकीघोल मार्ग भुदरगड तालुक्‍यातत जाईल, असा अंदाज आहे. 
- ए.डी.पाटील, सहाय्यक वन सरंक्षक 

कदाचित पुर्वी कामासाठी वापरण्यात येणारा हत्ती - बेन 
याबाबत मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) क्‍लेमेंट बेन म्हणाले, हा हत्ती कदाचित काही वर्षांपूर्वी केरळमध्ये, कर्नाटकमध्ये कामासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्तींपैकी एक असावा असे वाटते. कारण पूर्वी वनविभाग वृक्षलागवड करून त्याची तोड करून त्यातून उत्पन्न मिळवत असे. पण उत्पन्न मिळविण्यासाठीही वृक्ष तोड करायची नाही, असे धोरण ठरले. त्यामुळे त्यावेळी वृक्षांची वाहतूक करण्यासाठी वन विभागाकडे असलेले हत्ती पुन्हा जंगलात सोडले गेले. ते हत्ती पुन्हा जंगलाचा घटक बनले. त्यापैकी काही हत्तींचा वावर मानवी अस्तित्व असलेल्या भागात आहे. कदाचित आपल्या भागात कर्नाटकातून आलेले काही हत्ती त्यापैकीच असावेत. अर्थात या हत्तींना पकडून परत पाठविण्यासाठी प्रस्ताव पाठवला. मात्र तोपर्यंत या हत्तीला बिथरवू न देणे, त्याच्यापासून लांब राहणे, खबरदारी घेणे हेच करावे लागेल. 

Web Title: Kolhapur News Elephant in Dajipur Wildlife Sanctuary