हत्तीचा उन्माद अन्‌ शेतकऱ्यांचा त्रागा...

सुधाकर काशीद
रविवार, 27 मे 2018

कोल्हापूर - ढवणाचा धनगरवाडा, मानवाड (ता. पन्हाळा) परिसरात काल (ता. २५) रात्री हत्ती रस्त्यालगत होता. बी. डी. पाटील यांच्या शेतातला ऊस कडाकडा मोडत होता. कडेची केळीची झाडे सोंडेने झटक्‍यात उपटत होता. त्याच्या दिशेने बॅटरीचा झोत टाकला, तर फुसकारत होता

कोल्हापूर - ढवणाचा धनगरवाडा, मानवाड (ता. पन्हाळा) परिसरात काल (ता. २५) रात्री हत्ती रस्त्यालगत होता. बी. डी. पाटील यांच्या शेतातला ऊस कडाकडा मोडत होता. कडेची केळीची झाडे सोंडेने झटक्‍यात उपटत होता. त्याच्या दिशेने बॅटरीचा झोत टाकला, तर फुसकारत होता. त्याला शेतातून हाकलून लावण्यासाठी लोकांचा कालवा सुरू होता. पण, हत्ती कोणालाही दाद देत नव्हता. काल रात्रीचा हा प्रसंग. रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत हत्ती पाटलांच्या शेतातच तळ ठोकून होता. 

हत्तीच्या चार दिवसांतील वावरामुळे मानवाड परिसरात रात्री अक्षरशः शुकशुकाट असतो. शेतात राखणीलाही माणूस नसतो. जिथे चार-पाच घरांची वाडी आहे, तिथले लोक रात्री एकत्र राहतात. एकमेकाला आधार देतात. काल रात्री पाटलांच्या शेतावर पाच-सहा जण मुक्कामाला होते. साडेदहा-पावणेअकराला शेताच्या एका बाजूचे कुंपण मोडल्याचा आवाज आला. त्यांना वाटले नेहमीप्रमाणे गवा असेल. पण, पाहता-पाहता कुंपण उखडले, आणि शेतात गवा नव्हे तर हत्ती आहे, हे सर्वांच्या ध्यानी आले. त्यांनी तत्काळ वन विभागाच्या पथकाला कळविले.

काही वेळात वन विभागाची जीप व चार कर्मचारी आले. हत्ती शेतात; पण रस्त्यापासून शंभर-दीडशे फुटांवर होता. काही तरुणांनी त्याच्यावर बॅटरीचे झोत टाकले. पण, त्याला हत्तीने दाद दिली नाही. त्याने तास-दीड तासात दोन एकरातला ऊस तुडवून टाकला. केळीची दहा-पंधरा झाडे उपटली व केळीचे 
सोट सोंडेने सोलून त्याच्या आतला गाभा खाल्ला.

पहिल्या-पहिल्यांदा सर्वांनाच वाटले की हत्ती थोडेफार खाऊन जाईल. पण, डोळ्यांदेखत होणारे नुकसान पाहून सर्वांनी ओरडून हत्तीला हुसकावण्यास सुरवात केली. ‘अरे बाबा आता जा की’ असे हात जोडून एक शेतकरी ओरडू लागला. समोर आपल्या शेतीचे नुकसान होत असताना ते पाहून शेतकऱ्याचा होणारा त्रागा चारही वन कर्मचाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिला.

हत्तीने शेतीचे नुकसान तर केलेच; पण मध्येच त्याने लाकडाचा एक ओंडका फिरवून लांबवर फेकला. त्यानंतर त्याने शेतातच एका कडेला असलेल्या पाटलांच्या घराकडे मोर्चा वळविला. हत्ती येत असल्याचे पाहून त्यांनी दारे लावून घेतली. खिडकीतून ते हत्तीकडे पाहत राहिले. तेव्हा हत्ती पंधरा ते वीस मिनिटे घरासमोर शांत उभा राहिला. पुन्हा घराच्या मागे आला. तेथेही शांत उभा राहिला. या वेळी मात्र सर्वांच्या अंगाचे पाणी-पाणी झाले. पहाटे तीनपर्यंत हत्तीचा हा थरार सुरू राहिला. सव्वातीन- साडेतीनला तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. 

‘अरे बाबा आता जा की रे’
अरे बाबा आता जा की रे’ असे हत्तीला उद्देशून हात जोडून ओरडत होते. हा शेतकऱ्यांचा त्रागाच होता. हत्तीने शेतातला ऊस, मका खाण्यास विरोध नाही. काय खातोय ते खाऊ दे, असे शेतकरी म्हणतात. पण, हत्ती खातो कमी व नुकसान जास्त करीत असल्याने ते संतप्त होतात.

हत्तीने आमच्या शेतीचे वन कर्मचाऱ्यांच्या समोरच नुकसान केले. तरीही सरपंच, तलाठी यांचा अहवाल त्यांना हवा आहे. हत्तीने नुकसान केले हे माहीत असतानाही पंचनाम्याचा कागदोपत्री घोळ वन विभागाने घालू नये. 
- बी. डी. पाटील,
शेतकरी, मानवाड

Web Title: Kolhapur News Elephant in Panahala Taluka