अकरावी केंद्रीय प्रवेशास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

पहिल्याच दिवशी दहा हजार अर्जांची विक्री; अकराशे जमा

कोल्हापूर - अकरावीचा प्रवेश अर्ज वेळेत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची चाललेली धडपड, अर्जासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि अर्ज दाखल केल्यानंतर चेहऱ्यावरील समाधानाचे चित्र, अशा वातावरणात 
अकरावीच्या केंद्रीय प्रवेशास आजपासून सुरवात झाली.

पहिल्याच दिवशी दहा हजार अर्जांची विक्री; अकराशे जमा

कोल्हापूर - अकरावीचा प्रवेश अर्ज वेळेत मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची चाललेली धडपड, अर्जासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि अर्ज दाखल केल्यानंतर चेहऱ्यावरील समाधानाचे चित्र, अशा वातावरणात 
अकरावीच्या केंद्रीय प्रवेशास आजपासून सुरवात झाली.

शहरातील ३८ केंद्रांवरून अकरावी केंद्रीय प्रवेशासाठी १०००४ अर्जांची विक्री झाली. तर ११०० अर्ज दाखल झाले. दहावीचा निकाल १३ जूनला जाहीर झाल्यानंतर तातडीने ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, ई-टेंडरिंगमधील तांत्रिक अडचणी, दहावीचा लांबलेला निकाल, यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू होत आहे. आज सकाळी साडेदहापासून कोल्हापूर हायस्कूल, स. म. लोहिया, कॉमर्स कॉलेज, महावीर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, कमला महाविद्यालय येथील वितरण केंद्रांवर गर्दी झाली. विज्ञान शाखेसाठी पांढऱ्या रंगाचा, कला शाखेसाठी गुलाबी रंगाचा, तर वाणिज्यसाठी हिरव्या रंगाचा अर्ज होता. प्रवेश नोंदणीसाठी मूळ गुणपत्रिका आवश्‍यक होती. 

दुपारी एकपर्यंत अर्ज वितरण केंद्रांवर अक्षरशः झुंबड उडाली. प्रवेश प्रक्रिया आठवडाभर चालणार असली तरी आजच मोठ्या संख्येने प्रवेश अर्ज दाखल झाले. महाराष्ट्र हायस्कूल, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, केएमसी, गोखले महाविद्यालय, शहाजी महाविद्यालय, शाहू महाविद्यालय येथे अर्ज दाखल झाले. अर्ज वितरण आणि स्वीकृती केंद्रांबाहेर मोठी धांदल उडाली. 

दहावीचा निकाल यंदा ९३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. विज्ञान शाखेसाठी एकेका टक्‍क्‍यांसाठी गुणवत्ता यादीत चुरस होणार आहे. संगणकाच्या आधारे प्रवेश निश्‍चित केले जातात. विद्यार्थ्यांना कोणत्याही तीन महाविद्यालयांना प्राधान्य देता येते. गेल्या वर्षी अमूक एका महाविद्यालयात किती टक्‍क्‍यांना प्रवेश बंद झाला, याची माहिती होती. त्याचीही काळजी विद्यार्थ्यांनी घेतली. प्रवेशाच्या निमित्ताने दिवसभर विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी धावपळ उडाली. आठ दिवसांनंतर प्रवेश अर्जांची छाननी, प्रत्यक्ष गुणवत्ता यादी, त्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू होतील.

अकरावी प्रवेश अर्जाचे चित्र...
शहरातील ३८ केंद्रावरून अकरावी केंद्रीय प्रवेशासाठी १०००४ अर्जांची विक्री झाली. तर ११०० अर्ज दाखल झाले. 
शाखानिहाय अर्जांची संख्या पुढील प्रमाणे होती. 
विज्ञान - ४७७०विक्री,  संकलन- ६३६, कला (मराठी) - 
१५१६ विक्री,  संकलन- १७५,कला (इंग्रजी) - २६ विक्री,  
संकलन- ४, वाणिज्य (मराठी) - २३२३ विक्री,  संकलन- १७२,  वाणिज्य (इंग्रजी) - १३६९ विक्री,  संकलन- ११४.

Web Title: kolhapur news eleventh centralise admission start