कोल्हापूर महापालिकेच्या सहाशे कर्मचाऱ्यांची खांदेपालट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

कोल्हापूर - महापालिकेतील पवडी कामगार, मुकादम, कनिष्ठ; तसेच वरिष्ठ लिपिक अशा सहाशे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पंधरा मेपर्यंत बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

कोल्हापूर - महापालिकेतील पवडी कामगार, मुकादम, कनिष्ठ; तसेच वरिष्ठ लिपिक अशा सहाशे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पंधरा मेपर्यंत बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

पालिकेच्या आस्थापनेवर वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्षे बदल्या झालेल्या नाहीत. जे कर्मचारी पाच वर्षांहून अधिक काळ एकाच विभागात आहेत, त्यांची बदली होणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या सहाशे इतकी आहे. या वर्गात झाडू, तसेच सफाई कामगारांचा समावेश होता; मात्र त्यांची नियुक्ती वॉर्डमध्ये असते. त्यासंबंधीचा निर्णय आरोग्य विभाग घेईल. झाडू कामगारांची संख्या १५६६ इतकी आहे.

वर्ग दोन आणि तीन मधील कर्मचाऱ्यांच्या पूर्वी बदल्या झाल्या आहेत; मात्र ज्यांचा कार्यकाळ तीन वर्षांहून अधिक झाला आहे, त्यांचाही बदली प्रक्रियेत समावेश झाला आहे. बदलीसाठी तीन वर्षांचा निकष लावला आहे. या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे दोनशे आहे. वर्ग चारमधील मुकादम, पवडी कामगार गेली अनेक वर्षे एकाच ठिकाणी आहेत. गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजारामपुरी, ताराराणी मार्केट अशा विभागीय कार्यालयातंर्गत हे कर्मचारी मोडतात.

सकाळी स्वच्छतेपासून ते भागातील खरमाती उचलणे, देखररेख अशी कामे त्यांच्याकडे असतात. बदल्‍यांत कनिष्ठ तसेच वरिष्ठ लिपिकांचाही समावेश आहे. आयुक्तांनी कठोर भूमिका घेऊन बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत.

वर्ग-४ मधील ज्या कर्मचाऱ्यांची सेवा पाच वर्षांहून अधिक झाली आहे, त्यांच्या बदल्या होतील. वर्ग-२ आणि तीनसाठी तीन वर्षांचा निकष लावला आहे. तिन्ही वर्गांत मिळून सुमारे आठशे कर्मचाऱ्यांच्या बदल्या पंधरा मेपर्यंत होतील.
-सुधाकर चेल्लावार,
कामगार अधिकारी

  • मनपाचे एकूण कर्मचारी  - 5 हजार
  • यांमध्ये झाडू तसेच सफाई कामगार - 2 हजार पगारापोटी महिन्याचा खर्च - 16 कोटी रुपये
Web Title: Kolhapur News employee transfer in Corporation