पंचगंगेवरील शिवाजी पुलाची ‘एन्डोस्कोपी’ पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - प्रजासत्ताकदिनी मिनी बस धडकल्याने शिवाजी पुलाच्या गाळ्यातील दगड निसटलेत का, किंवा दगडांचे सांधे निखळलेत का, यासाठी प्रत्येक गाळ्याची ‘एन्डोस्कोपी’ करण्यात आली. या तपासणीत प्रत्येक गाळ्यात असलेल्या छिद्रातून कॅमेऱ्याद्वारे आतील भागाची छायाचित्रे 
घेण्यात आली.  

कोल्हापूर - प्रजासत्ताकदिनी मिनी बस धडकल्याने शिवाजी पुलाच्या गाळ्यातील दगड निसटलेत का, किंवा दगडांचे सांधे निखळलेत का, यासाठी प्रत्येक गाळ्याची ‘एन्डोस्कोपी’ करण्यात आली. या तपासणीत प्रत्येक गाळ्यात असलेल्या छिद्रातून कॅमेऱ्याद्वारे आतील भागाची छायाचित्रे 
घेण्यात आली.  

दरम्यान, आत्तापर्यंत दोन तपासण्या झाल्या, आज राहिलेली एक तपासणी होणार आहे. आज (शुक्रवारी) पुलाच्या कमानीचा वरचा भाग व रस्ता यांच्यामध्ये असलेल्या भरावाची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी आजही पुलावरील वाहतूक दिवसभरासाठी बंद ठेवली आहे. 

२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी या पुलाच्या दक्षिण बाजूवरून मिनी बस नदीत कोसळून १३ जण ठार झाले. या घटनेनंतर पुलाचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्याचा निर्णय झाला. कालपासून (ता. ७) हे ऑडिट सुरू झाले. या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनीतर्फे हे काम सुरू आहे. अपघातग्रस्त बसच्या धडकेने पुलाच्या इतर भागाला काही झाले आहे का, या तपासणीबरोबरच पूल किती मजबूत आहे, त्यावरून किती क्षमतेच्या वाहनांची वाहतूक 
सुरू ठेवता येईल, याचा अभ्यास या तपासणी दरम्यान होणार आहे.

कंपनीच्या तज्ज्ञांनी पुलाखालील प्रत्येक कमानीत जाऊन तपासणी केली. प्रत्येक कमानीखाली छोटी छिद्रे आहेत, त्यात ‘एन्डोस्कोप’ सोडून आतील दगडांचे फोटो घेतले. या तपासणीतून कमानीतील दगड निखळले आहेत का? त्यांचे सांधे सुटले का? याची माहिती घेतली. हे सर्व फोटो संगणकावर एकत्र केले. पुलाच्या पाचही कमानीत ही चाचणी घेतली. त्याचबरोबर प्रत्येक कमानीतील दगड जोडलेल्या मिश्रणाचे नमुनेही ‘ड्रील’ मारून घेतले. या मिश्रणाच्या नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. ही सुविधा पुणे येथे आहे.  

एन्डोस्कोपीबरोबरच ‘प्रोफाईल मॅपिंग’ ही तपासणीही केली. या तपासणीत कमानीचा आकार पुर्वी होता तसाच आहे की, अपघातामुळे कमानी झुकल्या आहेत. याची माहिती घेतली. आज (शुक्रवार) पुलाची ‘जीपीआर’ तपासणी होणार आहे. यात पुलाच्या कमानीचा वरचा भाग व रस्ता यांच्यात असलेल्या भरावाची तपासणी होणार आहे. त्यातून भराव टिकाऊ आहे का ? पुलाला त्याचा भार पेलतो का? आणखी भरावाची आवश्‍यकता आहे का ? याची माहिती घेतली जाईल. यासाठी आवश्‍यक असलेले यंत्र पुण्याहून सायंकाळपर्यंत आले नव्हते. 

नव्या पुलाचीही तपासणी
शिवाजी पुलाला पर्याय म्हणून बांधलेल्या व अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलाचेही ‘स्ट्रक्‍टरल ऑडिट’ आज केले. वर्षभरापासून या पुलाचे बांधकाम बंद आहे. उर्वरित काम सुरू करायचे झाल्यास सध्या झालेले काम मजबूत आहे का, याची तपासणी यातून होणार आहे. यासाठी पुलाच्या पृष्ठभागावर ‘ड्रील’ मारून मिश्रणाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. 

सर्व रेकॉर्ड संगणकावर
शिवाजी पुलाच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या. या तपासणीचे सर्व रेकॉर्ड संगणकावर आहे. मिश्रणाचे रासायनिक पृथ्थकरण, काढलेल्या फोटोंची तपासणी याचा अभ्यास करून पुलाच्या दर्जाबाबत सात दिवसांनंतर अहवाल देण्यात येईल, अशी माहिती हे काम करीत असलेल्या ‘स्ट्रक्‍टवेल’ कंपनीचे टेिक्‍नकल डायरेक्‍टर जयंत कदम यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

अत्याधुनिक यंत्रणा
पुलाच्या ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’साठी अत्याधुनिक यंत्रणा कंपनीने आणली आहे. यासाठी क्रेनसह असलेल्या ट्रकचीच किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. ही क्रेन पुलाच्या खाली कशाही पद्धतीने वळवता येते. त्यातून कंपनीचे तीन तंत्रज्ञ खाली जाऊन तपासणी करतात. हे काम पाहण्यासाठी पुलावर लोकांनी गर्दी केली होती.

Web Title: Kolhapur News Endoscopy of Shivaji Bridge