भात लावणीचा आनंद अन्‌ त्याच तांदळाचा आस्वाद

सुधाकर काशीद
सोमवार, 3 जुलै 2017

कृषी पर्यटनाचा नवा फंडा - राधानगरी तालुक्‍यात पर्यटकांना खुणावतेय नवी वाट

कोल्हापूर - राधानगरी तालुक्‍यात रप रप पडणारा पाऊस, हिरवीगार झाडी आणि रस्त्यालगतच्या शेतातील चिखलात सुरू असलेली भाताची लावण, हे पाहून काही मुंबईकर पर्यटक गाड्या थांबवून उभे राहिले. हे काय चालले आहे, असे त्यांनी विचारले. 

कृषी पर्यटनाचा नवा फंडा - राधानगरी तालुक्‍यात पर्यटकांना खुणावतेय नवी वाट

कोल्हापूर - राधानगरी तालुक्‍यात रप रप पडणारा पाऊस, हिरवीगार झाडी आणि रस्त्यालगतच्या शेतातील चिखलात सुरू असलेली भाताची लावण, हे पाहून काही मुंबईकर पर्यटक गाड्या थांबवून उभे राहिले. हे काय चालले आहे, असे त्यांनी विचारले. 

‘‘तुम्ही खाता त्या भाताची ही पेरणी आहे,’’ असे शेतकऱ्यांनी सांगितले. भात असा लावतात. त्यातून पुढे तांदूळ तयार होतो, हे पर्यटकांना माहीतच नव्हते. मग कुतूहलाने काही पर्यटक भात लावणीसाठी चिखलात उतरले. त्यांनी जमेल तशी पण खूप मनापासून भाताची काही रोपे लावली. शेतकऱ्यांच्या बांधावरच गरम गरम चहाचे घोट घेतले व पर्यटक निघून गेले...

पण त्यापुढे खूप वेगळे घडले. ते भात रुजले, वाढले आणि शेतकऱ्यांच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले. त्या पर्यटकांचा शेतकऱ्याने पत्ता लिहून घेतला होता. त्या पत्त्यावर त्या शेतकऱ्याने ‘‘तुम्ही लावलेल्या भाताचा तांदूळ’’ असे पार्सलवर लिहून त्या पर्यटकांच्या पत्त्यावर पाठवले. पाच-सहा दिवसांनी त्या पर्यटकाचे पत्र आले, सोबत त्यांनी पाचशे रुपये पाठवले होते आणि त्या ५०० रुपयाचे आणखी तांदूळ आम्हाला पाठवा, अशी विनंती केली होती. त्यानुसार तांदूळ पाठवले गेले. यानिमित्ताने कृषी पर्यटनाचे वेगळे विचार या परिसरातल्या शेतकऱ्यांत रुजले गेले.

या पावसाळ्यात या पर्यटनाची सुरुवातही झाली आहे. मुंबई, पुणे नव्हे तर कोल्हापुरातील पर्यटकांनीही राधानगरी परिसरात येऊन भाताची लावण करण्याचा आनंद घ्यावा. काही दिवसांनी तोच तांदूळ त्या शेतकऱ्यांकडून खरेदी करावा व स्वतः प्रतीकात्मक लावण केलेल्या ‘राईसचा’ अनुभव घ्यावा, अशी संकल्पना राबवली गेली आहे. राधानगरीतील बायसन नेचर क्‍लबच्या युवकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पावसाळी पर्यटन म्हणजे धबधबा, दारू, मटण आणि ओल्या अंगाने केला जाणारा धिंगाणा, असे हे चित्र बदलण्यासाठी ही नवी संकल्पना आकारास आणली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात धुवांधार पाऊस कोसळतो. या भागात भाताची शेती प्रामुख्याने आहे. पावसाळ्यात वाफ्यात गरगरीत चिखल करून तरवा पद्धतीने भात लावतात. भात लावायची ही पद्धत कष्टाची, कौशल्याची असते; पण वरून धुवांधार पडणारा पाऊस, चिखलाने भरलेले वाफे व त्यात वाकून भाताची रोपे लावणारे शेतकरी हे दृश्‍य नवख्या लोकांना खूप कुतहुलाचे वाटते. गरगरीत चिखलात आपणही उतरावे, चिखलात मळून जावे, अशी एक सहजसुलभ भावना बहुतेकांत असते. नेमकी हीच भावना ओळखून बायसन नेचर क्‍लबने भात लावणीला कृषी पर्यटनाची जोड दिली. हे पहिलेच वर्ष असल्याने संख्या कमी आहे; पण पावसाच्या धारा अंगावर झेलत, चिखलात मळत भात लावणीसाठी पर्यटक वाफ्यात उतरू लागले आहेत. 

यातून पर्यटकांनी काही महिन्यांनी तांदूळ विकत घ्यावा, ही अपेक्षा आहे. कारण भात लावणीसाठी आपण ज्या वाफ्यात उतरलो, त्याच वाफ्यातला ‘राईस’ डायनिंग टेबलवर खाण्याची कल्पना पर्यटकांच्या दृष्टीने वेगळा आनंद देणारी आहे.

आता पावसाळी पर्यटनासाठी राधानगरी, दाजीपूर, फोंडा घाट भागात आलेल्या पर्यटकांना बायसन नेचर क्‍लबचे युवकही भात लावण करण्याची संकल्पना सांगतात. बहुतेक पर्यटक आनंदाने भात लावणीसाठी चिखलात उतरतात. या क्षणी यातून खूप मोठा आर्थिक लाभ अपेक्षित नाही; पण यानिमित्ताने शहरी पर्यटक काही क्षणतरी शेतीचा, भात लावणीचा आनंद घ्यायला पुढे येतोय, हे चांगले चित्र आहे.

भात शेती जरूर कष्टाची आहे; पण इतर लोकांच्या कुतूहलाचीही आहे. अनेकांना वाटते, आपणही चिखलात उतरावे. आम्ही ती संधी दिली आहे. फक्त काही महिन्यांनी त्या शेतकऱ्यांकडून थोडे तरी तांदूळ संबंधितांनी विकत घ्यावेत, एवढीच आमची अपेक्षा आहे.
-सम्राट केरकर, बायसन नेचर क्‍लब, राधानगरी

Web Title: kolhapur news The enjoyment of rice plantation