पर्यावरणाचे रोल मॉडेल..!

पर्यावरणाचे रोल मॉडेल..!

कोल्हापूर - पर्यावरणपूक उत्सवाची कास धरताना सजग कोल्हापूरकरांनी गेल्या वर्षी जिल्ह्यात तब्बल तीन लाखांवर मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. त्याशिवाय तब्बल दीड हजारांवर ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. यंदाही कोल्हापूरकर ही परंपरा जपणार असून पर्यावरणाच्या कोल्हापूरच्या यशस्वी मॉडेलचा आदर्श राज्याला मिळणार आहे. 

जिल्हा परिषदेची तयारी
पर्यावरणपूरक विसर्जनाचा उपक्रम राबविणारी कोल्हापूर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद आहे. यंदाही जिल्हा परिषदेने पर्यावरणपूरक विसर्जनाचे गाववार नियोजन केले आहे. तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना ‘स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०१७’ संदर्भात पत्र पाठविले आहे. हा उपक्रम राबवत असताना जो निधी लागेल किंवा जी साधने लागतील त्यासाठी ग्रामपंचायत निधीतून खर्च करावा, अशा सूचना या पत्रातून दिल्या आहेत. 

महापालिकेची तयारी
कोल्हापूर महापालिकेचे सहाशे कर्मचारी, अग्निशमन दल, विद्युत विभागासह सर्व यंत्रणा पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कार्यरत असेल. पंचगंगा घाट संवर्धन समिती आणि इतर संस्थांच्या सहकार्याने ठिकठिकाणी विसर्जन कुंड, काहिलींची व्यवस्था केली आहे. संकलनासाठी चाळीस ट्रॅक्‍टर, बारा डंपर, चार जेसीबी तैनात असतील. आरोग्य विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली असून प्लास्टिकचा कचरा स्वंतत्रपणे गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे तीनशे कर्मचारी कार्यरत असतील. अवनि व एकटी संस्थेमार्फत निर्माल्याचे विलगीकरण करून वाशी येथे खत तयार करण्यासाठी दिले जाईल. 

शहरात येथे असेल व्यवस्था
- इराणी खण, तांबट कमान येथील कुंड, मोहिते खण, गंजीवली खण, रामानंदनगर चौपाटी, संध्यामठ, राजे संभाजीनगर तरुण मंडळ, पदपथ उद्यान, पतौडी खण, सरदार तालीम, संभाजीनगर, साळोखेनगर, तलाव परिसर, पंचगंगा नदी घाट परिसर, प्रायव्हेट हायस्कूल पटांगण, स्वामी समर्थ मंदिर, नारायणदास मठ, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, सायबर चौक व राजाराम गार्डन, राजाराम बंधारा कसबा बावडा, नर्सरी उद्यान रुईकर कॉलनी, बापट कॅम्प नदी परिसर, मसुटे मळा, महावीर गार्डन

शहरातील विसर्जन 
२०१० - १२०० मूर्ती,  ५० टन निर्माल्य
२०११ - १५४० मूर्ती, ६० टन निर्माल्य
२०१२ - २८०० मूर्ती, ९५ टन निर्माल्य
२०१३ - दहा हजार मूर्ती, १२० टन निर्माल्य
२०१४ - ४० हजार मूर्ती, १४० टन निर्माल्य
२०१६ - कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ४३ हजार ५५३ मूर्ती आणि दोनशे ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. जिल्ह्यातील इतर भागात एकूण दोन लाख ९२ हजार ८४२ मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन तर १५४१ ट्रॅक्‍टर निर्माल्य संकलित झाले. (कोल्हापूरच्या पर्यावरणपूरक विसर्जनाच्या मॉडेलचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ‘मन की बात’ कार्यक्रमात केला होता.)

‘यिन’चा सहभाग
डिलीव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-‘यिन’चे सदस्य पर्यावरणपूरक विसर्जनासाठी लोकांना 
मदत करणार आहेत. पंचगंगा घाटावर सकाळी दहा ते दुपारी चार आणि चारनंतर अशा 
दोन टप्प्यात हे महाविद्यालयीन विद्यार्थी 
कार्यरत असतील.

व्हाईट आर्मी सज्ज
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी व्हाईट 
आर्मी सज्ज असून पंचगंगा घाट, 
रंकाळा, इराणी खण, कोटीतीर्थ आदी 
ठिकाणी व्हाईट आर्मीचे जवान लाईफ 
जॅकेटसह तैनात असतील. त्याशिवाय नदी किंवा तलावात विसर्जन न करता 
पर्यावरणपूरक विसर्जन करावे, असे आवाहन ते सर्वांना करतील.

पंचगंगा नदीसह शहरातील तलावांच्या प्रदूषणमुक्तीसाठी पर्यावरणपूरक विसर्जनावरच कोल्हापूरकरांनी भर द्यावा. महापालिका पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
- हसीना फरास, महापौर

कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक विसर्जन ही एक लोकचळवळच केली आहे. यंदाही ते या चळवळीत सक्रिय सहभागी होतील, यात शंका नाही.
- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

पर्यावरणपूरक विसर्जनाचा आदर्श कोल्हापूरने राज्याला घालून दिला आहे. यंदा हा उपक्रम शंभर टक्के यशस्वी होईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
-उदय गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com