माजी मंत्र्यांचे खुनशी राजकारण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

कोल्हापूर - कसबा बावडा येथील माजी गृह राज्यमंत्री यांचे संस्थान खालसा होण्याची चिन्हे दिसू लागल्याने त्यांचे बगलबच्चे पालकमंत्र्यांवर बेछूट आरोप करीत आहेत. पालकमंत्र्यांनी हे संस्थान खालसा करावे आणि कसबा बावड्यातील नागरिकांची खुनशी राजकारणातून मुक्तता करावी.

कोल्हापूर - कसबा बावडा येथील माजी गृह राज्यमंत्री यांचे संस्थान खालसा होण्याची चिन्हे दिसू लागल्याने त्यांचे बगलबच्चे पालकमंत्र्यांवर बेछूट आरोप करीत आहेत. पालकमंत्र्यांनी हे संस्थान खालसा करावे आणि कसबा बावड्यातील नागरिकांची खुनशी राजकारणातून मुक्तता करावी. पालकमंत्र्यांनी बावड्यातील दहशत आणि जहागिरी संपवण्याचे आवाहन केले होते; मात्र हे आपल्यालाच लागू पडते, याची आठवण माजी गृह राज्यमंत्री व त्यांच्या सैनिकांनी जनतेसमोर आणून त्यांचे खरे रूप उघड केले आहे, असा टोला भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती आशीष ढवळे, नगरसेवक विजय खाडे, संतोष गायकवाड, अजित ठाणेकर यांनी पत्रकाद्वारे सतेज पाटील यांना लगावला आहे.

पत्रकात म्हटले आहे, देवस्थान, पालिकेच्या जमिनींवर दरोडे घालून सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम त्यांनी केले आहे. हे संस्थान मोडण्यासाठी आता स्थानिक जनतेतूनच उठाव सुरू झाला आहे. 

पालकमंत्र्यांनी केवळ जनतेच्या भावना बोलून दाखवल्या. पहिल्या आमदारकीच्या वेळी ‘दादा मला पुरस्कृत करा’ म्हणून दादांच्या दारात जाणाऱ्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवताना पाच झेंडे गाडीवर लावले होते. त्यात भाजपचा झेंडा होता. त्यांच्या जीवावरच पहिल्यांदा आमदार झालेल्या या माजी राज्यमंत्र्यांनी नंतर भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तसेच राजकीय गुरू म्हणून शिरोलीकरांबरोबर राहिले. नंतर यांनी त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला. पालकमंत्री पाटील यांनी कधीही व्यक्तिगत किंवा द्वेषाचे राजकारण केले नाही. आम्ही त्यांच्याबरोबर या विचारसरणीतूनच गेलो आहे.  

रस्ते विकास प्रकल्प आणून कोल्हापूरच्या जनतेवर टोल लादला आणि टोलची पहिली पावती स्वतः फाडून आपले कर्तृत्व दाखवून आपण सूर्याजी पिसाळ असल्याचे साऱ्या जनतेसमोर दाखवून दिले. त्यांची ही कोती वृत्ती ओळखून मतदारांनी करपलेली भाकरी पलटली. राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या या माजी गृह राज्यमंत्र्यांनी कसबा बावडा येथे आपले स्वतंत्र संस्थान उभे केले. त्यांच्याच जमिनीही आपल्या घशात घालण्याचे काम त्यांनी केले. बावड्यातील जनता दहशतीखाली आहे. ही दहशत मोडण्याचे काम पालकमंत्र्यांनी केल्याने माजी गृह राज्यमंत्र्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पालकमंत्री पाटील यांनी आयुष्यातील २० वर्षांहून अधिक काळ देश पिंजून काढून देशाची सेवा केली. स्वतःला किंवा स्वतःच्या नातेवाइकांचा राजकीय स्वार्थ साधला नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

संस्थानास सुरुंगामुळे बगलबच्चे हादरले
देशातील २३ राज्यांतील दडपशाही व जहागीरदारी मोडीत काढण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे त्यांनी कसबा बावडा येथील दहशत, गुंडगिरी मोडण्यासाठी पुढाकार घेतल्याने बगलबच्चे हादरले आहेत. त्यातूनच ही कोल्हेकुई सुरू आहे. प्रत्येक कामात आपला ढपला संस्कृती हे धोरण असणाऱ्या या माजी मंत्र्याला पालकमंत्र्यांच्या नखाचीही सर येणार नाही. बावड्यातील हे संस्थान खालसा करण्यासाठीची सुरुवात पालकमंत्र्यांनी केली आहे, आता हळूहळू हे संस्थान खालसा करूनच भाजपचे कार्यकर्ते थांबतील, असा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.

आमच्यासाठी उंबरे झिजवून उपकार केले नाहीत - उलपे

आम्ही तुमच्यासाठी रात्रीचा दिवस केला. घरदार सोडून तुमच्या मागे फिरलो. प्रसंगी आम्ही शिक्षा भोगल्या. असे असताना आम्ही जर कावळे असतो तर या कावळ्यांचे महत्त्वही फार मोठे आहे. शेवटी कावळ्यांसाठीच थांबावे लागते. एवढे लक्षात राहू द्या, असे पत्रक माजी नगरसेवक प्रदीप उलपे व राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांनी दिले.

पत्रकात म्हटले आहे, की आम्हीही त्यांच्यासाठी रक्‍ताचे पाणी केले आहे. पायाला भिंगरी बांधून फिरलो म्हणून ते आमदार व मंत्री झाले. ज्यांनी गाडीला सहा झेंडे, जे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात होते, जे काँग्रेस संपविण्याच्या तयारीत आहेत ते आम्हाला खोबरं तिकडं चांगभलं कसे म्हणतात? ज्या नगरसेवकांच्या नावाने पत्रक काढून अम्हाला टार्गेट केले जाते, ते नगरसेवक आमचे जुने सहकारी आहेत. त्या सर्वांची अवस्था आम्हाला माहीत आहे. तोंड बांधून बुक्‍क्‍यांना मार ते सहन करतात. आम्ही नगरसेवक झालो, तुम्ही आमच्या मागे फिरला; पण आम्ही तुमच्यासाठी पुढे होतो ते तुम्ही विसरलात. मी सामान्य कार्यकर्ता आहे. 
स्वत:च्या ताकदीवरच निवडून आलो. तुमच्याशी प्रामाणिक होतो म्हणूनच तुम्ही पद देऊन आमच्यावर उपकार केले, असे कोणी समजू नये. शाहू जन्मस्थळाच्या नावाखाली त्यांनी स्वत:च्या शैक्षणिक संस्थेचा परिसर, निवासस्थानाच्या परिसराचा विकास करून घेतला. त्यावेळी बावड्यातील इतर परिसराचा विकास करावा, असे वाटले नाही का? वीस वर्षे त्यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक, महत्त्वाची पदे यांच्याकडे, स्वत: मंत्री, दहा वर्षे आमदार असूनही पाण्याची टाकी पूर्ण होत नाही, ड्रेनेज लाईन टाकता येत नाही, कचरा प्रकल्पाची सुधारणा करता येत नाही, बावड्यातील शेतकऱ्यांशी निगडित पाणंद रस्ते करता येत नाहीत, हा बावड्याचा विकास..!

Web Title: Kolhapur News Ex Ministers political issue