कोल्हापूरची भाकरी, पोळी सातासमुद्रापार

कोल्हापूरची भाकरी, पोळी सातासमुद्रापार

कोल्हापूर - कोल्हापूरची भाकरी लई भारी... पुरणाची पोळी तर त्याहूनही भारी... टम्म फुगलेल्या तीन पदराच्या चपातीची तर चवच न्यारी; पण कोल्हापुरातून बाहेर किंवा परदेशात गेल्यावर या भाकरीची, पुरणपोळीची आठवण आली तर...? या प्रश्‍नाचे उत्तर आता एका पाकिटात दडले आहे.

या पाकिटात कोल्हापूरची भाकरी आहे, पुरणपोळी आहे, चपाती आहे... एवढंच काय, धपाटेही (थालीपीठ) आहे. तुम्ही फक्‍त ते गरम करून खायचे आहे आणि हे पाकीट पुन्हा फ्रिजमध्ये ठेवले, की ते पुढे कितीही दिवस वापरता येणार आहे. 

कोल्हापूरच्या अनुराधा पित्रे व सोनाली शिंदे या दोन भगिनींनी ही खाद्य करामत करून दाखवली आहे. पटणार नाही, रोज २४ हजार चपाती, भाकरी, पुरणपोळीचे पार्सल त्यांच्याकडून जात आहे. सध्या परदेशात जाणाऱ्या, दीर्घकाळ समुद्रात राहणाऱ्या अनेक बोटींवर, क्रूझवर या कोल्हापुरी चपाती, भाकरी व पोळ्या आहेत. बाहेर राहूनही घरातलं खायला मिळाल्याचे समाधान त्या देतात. कोल्हापूर हे उद्योगाचे शहर आहे. त्यात शिंदे आणि पित्रे वहिनींनी आणखी भर घातली आहे. बदलत्या जगाशी जुळवून घेताना त्यातून नव्या कल्पना, नवे उद्योग कसे जन्म घेतात याचे हे उदाहरण ठरले आहे. 

व्हेजइट या नावाखाली त्यांनी चार महिन्यांपूर्वी या नव्या खाद्यउद्योगाची सुरुवात केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर म्हणता म्हणता त्यांच्या भाकरी, चपाती, पुरणपोळीची चव साता समुद्रापार जाऊन पोहोचली आहे. त्यांनी गोकुळ शिरगाव येथे उद्योगाची सुरुवात केली. बहुतेक सर्व काम मशिनवर; पण मिश्रण करताना चवीची गोडी त्यांच्याच हाती राहिली. चपाती, भाकरी, पोळी, थालीपीठ त्या अर्ध्याकच्च्या स्वरूपात तयार करतात. त्या विशिष्ट तापमानात पॅक करतात व पुढची प्रक्रिया अशी, की पाकिटातून त्या बाहेर काढून तव्यावर भाजल्या की ताटात घ्यायला तयार होतात. त्यासाठी इतके चांगले धान्य व इतर पदार्थ वापरतात, की सर्वांच्या पसंतीस उतरतात. 

मॉल, किराणा दुकानातही 
आता अनेक क्रूझवर, बोटीत पित्रे व शिंदे वहिनींच्या चपाती, भाकरी, पोळ्या आहेत. नोकरीवर जाणाऱ्या महिलाही या पोळ्यांची पाकिटे घरातील फ्रिजमध्ये ठेवतात. आता तर जेथे फ्रिजची सोय आहे अशा मॉल, किराणा मालाच्या दुकानात, बेकरीतही त्या आपल्या पोळ्यांची पाकिटे ठेवणार आहेत. म्हणजेच अगदी अडचणीच्या क्षणी भाकरी, चपाती, पुरणपोळीही घरी विकत आणता येणार आहे.

घरच्या जेवणाची गोडी वेगळीच असते. पण नोकरी, व्यवसाय, प्रवासाच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्यांना असे घरचे जेवण मिळत नाही. आम्ही ही गरज ओळखून ही ‘प्रिझर्व्हेटेड’ भाकरी, पुरणपोळी, चपाती, थालीपीठ तयार केले. त्याला तव्यावर भाजले, की घरचाच पदार्थ खाल्ल्याचे समाधान मिळते. आज अनेक क्रूझवर आमच्याच भाकरी, पुरणपोळी, चपात्या आहेत. भविष्यात आणखी नवे प्रयोग करणार आहोत. 
- अनुराधा पित्रे, सोनाली शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com