तोतया पोलिसांचा ज्येष्ठास साडेतीन लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

कोल्हापूर -  ‘‘मी पोलिस आहे, मला ओळखले की नाही, पुढे लूटमार सुरू आहे. तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा,’ असे सांगून फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटले.

कोल्हापूर -  ‘‘मी पोलिस आहे, मला ओळखले की नाही, पुढे लूटमार सुरू आहे. तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा,’ असे सांगून फिरायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला लुटले.

त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठी असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज काढून घेऊन दोघे तोतया पोलिस फरारी झाले. 
रुईकर कॉलनीतील मैदानावर सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. एलआयसी कॉलनीतील शिवाजी महादेव लायकर यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी लायकर नेहमीप्रमाणे रुईकर कॉलनीतील मैदानावर फिरायला निघाले होते.

सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना दोघांनी थांबविले. मी पोलिस आहे, मला ओळखले की नाही? अशी बतावणी करून, या रस्त्याने सोने घालून फिरू नका. चार दिवस झाले लूटमार सुरू आहे, असे सांगितले. याचवेळी त्याच्या बरोबर असलेल्या एकाने खिशातील रुमाल काढून त्यांच्यासमोर ठेवला. यामध्ये तुमचे दागिने काढून ठेवा, असे सांगितले.

पोलिस सांगतोय म्हटल्यावर लायकर यांनी दहा तोळ्यांची सोन्याची चेन, एक तोळे सोन्याची अंगठी, एक तोळे वजनाची सोन्याची चेन, सव्वा लाख रुपयांचे कंपनीमेड घड्याळ, असा सुमारे तीन लाख साठ हजार रुपयांचा ऐवज त्यांनी रुमालात ठेवला. त्यानंतर काही क्षणांतच ते फिर्यादी लायकर यांना काही न कळताच तेथून चकवा देऊन निघून गेले. थोड्या वेळानंतर लायकर यांना लुटल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ज्येष्ठांनाच केले लक्ष्य
दोघा लुटारूंपैकी एकाचे वय अंदाजे ४० ते ४५ होते, तर दुसऱ्याचे ३० ते ३५ होते. अशाच प्रकारे सानेगुरुजी वसाहत परिसरात आठवड्यापूर्वीच चोरट्यांनी एका ज्येष्ठास लुटले. ज्येष्ठांनाच लुटणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

Web Title: Kolhapur News fake police theft case

टॅग्स