संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम 

संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम 

कोल्हापूर - "शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे', "अटी, शर्ती रद्द करा', "ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागे घ्या' यांसारख्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत जिल्ह्यातील सर्वच शेतकरी संघटनांच्या वतीने आज जिल्ह्यात 14 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गाबरोबरच शहरातही वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर तसेच शिवाजी पुलाजवळ वाहनांच्या एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. 

सरसकट कर्जमाफी द्या, उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव द्या, स्वाभिमाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा या मागण्यांसाठी आज राज्यभर सर्वच शेतकरी संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात 14 ठिकाणी झालेल्या या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांचेही कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

रत्नागिरीहून शहरात येणारा मार्ग वडणगे फाट्यावर रोखून धरल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. परिणामी शहरात आंदोलन संपल्यानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना मोठे कष्ट घ्यावे लागले. वडणगे फाट्यावरील आंदोलनात आदम मुजावर, ऍड. अजित पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्य रणजित पाटील आदी सहभागी झाले होते. अशीच स्थिती शिरोली फाट्यावरील महामार्ग, राधानगरी रोडवर पाहायला मिळाली. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना बाजूला करून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले. 

राधानगरी तालुक्‍यासह भोगावती साखर कारखाना कार्यक्षेत्रात अनेक रस्त्यांवर चक्काजाम करण्यात आला. यामुळे सकाळी नऊ ते बारापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. 

शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने आज कर्जमाफीचे धोरण तातडीने निश्‍चित करावे, यासाठी चक्का जाम करण्यात आला. यासाठी कोल्हापूर-राधानगरी राज्य मार्ग रोखून धरत अंदोलन झाले. सदाशिवराव चरापले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुशील पाटील- कौलवकर, मोहन धुंदरे, शिवाजी पाटील, संजय पाटील, सदाशिव खडके, व्ही. आर. चरापले, दत्तात्रय पाटील, संभाजी पाटील, के. द. पाटील, आर. के. पाटील, विठ्ठल महाडेश्‍वर आदींनी सहभाग घेतला. 

आमजाई व्हरवडे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शे.का. पक्षासह अनेक कार्यकर्त्यांनी चक्काजाम केला. या वेळी संघटनेचे अण्णाप्पा चौगले, शेकापचे एकनाथ पाटील, जनता दलाचे वसंतराव पाटील यांनी भाषणे केली. शेकापचे तालुका चिटणीस अंबाजी पाटील, गणपती कवडे, दत्तात्रय पाटील, बळवंत पाटील, शिवाजी सावंत, मोहन पाटील, वसंतराव पाटील, विश्‍वास परीट, संजय डकरे सहभागी झाले होते. येथे राधानगरीचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत सुर्वे यांनी बंदोबस्त ठेवला होता. 

कुरुकली (ता. करवीर) येथे शाहू शेतकरी आघाडीचे नेते टी. आर. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते; तर हळदी येथेही चक्का जाम केला होता. तीन तासांच्या या जाममुळे कोल्हापूरहून व कोकण, राधानगरीकडून येणारी वाहने ठप्प झाली होती. 

शिरोली पुलाची - शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सुमारे पंधरा मिनिटे महामार्ग रोखून धरला. त्यामुळे सुमारे एक तास वाहतुक विस्कळित झाली. 

शासनाने त्वरित कर्जमाफी द्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी शिरोली पुलाची येथे या आंदोलना दरम्यान दिला. अस्मानी संकटाशी लढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना बळ द्यावे, असे आवाहन गिरीश फोंडे यांनी केले. 

यावेळी आंदोलक शासनाच्या विरोधात घोषणा देत, पंचगंगा पुलानजीक राष्ट्रीय महामार्गावर आले. त्यांनी शासन, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणा दिल्या. कर्जमाफी आमच्या हक्काची - नाही कुणाच्या बापाची, शासनाचे करायचे काय- खाली डोके वर पाय अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आंदोलकांनी सुमारे पंधरा मिनिटे महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन, महामार्गावरील वाहतूक सुरू केली. आंदोलकांना पोलिस ठाण्यात नेऊन सोडून दिले. प्रकाश कांबरे, सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, संजय चौगुले, विक्रम पाटील, इलाई जंगले, अमरदीप देसाई, प्रकाश मोदुगडे, पंकज खोत, नवनाथ मोरे, अतुल दिघे, बाबूराव कदम, निशीकांत पदमाई, मुस्सा देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी बंदोबस्त ठेवला. 

आजऱ्यात वाहतूक ठप्प 
आजरा - येथील संभाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना, सर्व श्रमिक संघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन झाले. शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या ठोकला. त्यामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प होती. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. स्वाभिमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, माजी उपसभापती निवृत्ती कांबळे, अमानुल्ला आगलावे, नारायण भंडागे यांची भाषणे झाली. या वेळी आजरा कारखाना उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, सखाराम केसरकर, सुरेश पाटील, श्री. भगुत्रे, रवी मुळीक उपस्थित होते. मोर्चाला मराठा महासंघाने पाठिंबा दिला होता. 

कबनूर येथे सर्वपक्षीयांचा चक्काजाम 
कबनूर : शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, माकप, शिवसेना यांच्यातर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य जयकुमार कोले यांच्या नेतृत्वाखाली मुख्य चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

विजय भोसले, बाबासाहेब कोकणे, प्रा. अशोक कांबळे, रवींद्र धनगर, राजाराम वाकरेकर, धुळगोंडा पाटील-धुळुसे, सुभाष निकम, सुभाष सुतार, हुसेन मुजावर, महावीर लिगाडे, मेहबूब मुल्ला, अशोक स्वामी, विनोद मुरचुट्टे, दीपक खूळ, आकाश कुरुंदवाडे, मुमताज हैदर, आप्पा परीट, बाबासाहेब पाटील, पुरंदर पाटील, दगडू कुंभार, सचिन गौंडवाळ, बाळू कदम सहभागी झाले. 

अंकली टोल नाक्‍यावर दीड तास रास्ता रोको 
जयसिंगपूर - अंकली टोल नाक्‍यावर दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार ए. वाय. दिवे यांना मागणीचे निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, सांगलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच त्यांच्या सुटकेसाठी पुन्हा अर्धा तास ठिय्या मारून रास्ता रोको करण्यात आला. जयसिंगपूर आणि सांगली पोलिसांच्या समन्वयातून आंदोलन मागे घेण्यात आले. 

सकाळी अकरा वाजता आंदोलनाला सुरवात काली. माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशी सरकारने जशाच्या तशा स्वीकारल्याशिवाय शेतकऱ्यांची उन्नती होणार नाही. शिफारशी स्वीकारल्यास भविष्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची वेळही येणार नाही, असे सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. शुभांगी शिंदे, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, सुभाष शेट्टी, नगरसेवक शैलेश चौगुले, आप्पासाहेब खर्डेकर, सचिन शिंदे, मन्सूर मुल्लाणी, राम शिंदे, माजी सभापती सौ. सुवर्णा अपराज, सविता भवरे, युनुस पटेल उपस्थित होते. 

आमदार उल्हास पाटील यांचा "यू टर्न' 
अंकली टोलनाक्‍यावर रास्ता रोको आंदोलनास सुरवात झाल्यानंतर आमदार उल्हास पाटील यांची बोलेरो सर्वप्रथम आंदोलनाच्या ठिकाणी आली. गर्दीमुळे गाडी थांबली. मात्र, दोन मिनिटे थांबून आमदार पाटील यांनी आपली गाडी मागे वळवली. सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या आमदार पाटील यांची गाडी पुन्हा जयसिंगपूरकडे वळली. 

आंदोलन झालेली ठिकाणे 
आजरा, लिंगनूर कापशी (कागल), सिद्धनेर्ली (कागल), मुदाळ (भुदरगड), हळदी (करवीर), आमजाई व्हरवडे (राधानगरी), कुडित्रे (करवीर), शिवाजी पूल, शिरोली महामार्ग, हुपरी (हातकणंगले), कबनूर (हातकणंगले), शिरोळ, हलकर्णी (चंदगड) व शाहूवाडी अशा 14 ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com