एक जूनपासून शेतकरी जाणार बेमुदत संपावर - रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

कोल्हापूर - शेतकरी विरुद्ध सरकार, असे महाभारत आता सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे महाभारत सुरूच राहील. कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी येत्या एक जूनपासून (गुरुवार) राज्यातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज पत्रकार 
परिषदेत दिली. 

कोल्हापूर - शेतकरी विरुद्ध सरकार, असे महाभारत आता सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे महाभारत सुरूच राहील. कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी येत्या एक जूनपासून (गुरुवार) राज्यातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज पत्रकार 
परिषदेत दिली. 

भाजीपाला, दूधदुभते, अंडी यासह शहराकडे जाणारा सर्व प्रकारचा कृषिमाल रोखून धरला जाईल, असेही त्यांनी सांगितले.एफआरपीमध्ये अडीचशे रुपयांची वाढ हा फसविण्याचा उद्योग असून उसाचे क्षेत्र घटल्यानेच अडीचशेंची वाढ जाहीर करावी लागली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रघुनाथदादा म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात आता शेतकरी आत्महत्या करणार नाही. तर दुसऱ्यास करण्यास भाग पाडू, कर्जमाफी, उसाला दुसरा हप्ता एक हजार रुपये द्या. पिकावर आधारित कर्जाची पद्धत बंद करा, निर्यातबंदी उठवा. या मागण्यांसाठी शेतकरी संपावर जात आहे. ऊस उत्पादकांसह सर्वच प्रकारचे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सरकारी धोरण शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. एक जूनपासून सुरू होणाऱ्या संपात कोल्हापूरसह, सांगली, सातारा, नगर जिल्ह्यातील शेतकरी संपात सहभागी होत आहेत. दूध दुभत्यासह भाजीपाला, शेतीशी संबंधित जी उत्पादने आहेत. ती शहराकडे जाणार नाहीत. सरकार मागण्यांसंबंधी ठाम भूमिका घेत नाही. तोपर्यंत संप सुरूच राहील. मध्यप्रदेश, कर्नाटकातही लोण पसरणार आहे. निम्या देशातील शेतकरी संपात सहभागी होतील, अशी स्थिती आहे.’’

पुणतांब्याच्या बैठकीवेळी संपासंबंधी चाळीस गावांनी ठराव दिले होते. दोन महिन्यांच्या आत मार्ग काढू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसे काही झाले नाही. त्यामुळे एक जूनपासून सुरू होणाऱ्या संपात सर्व संघटना सहभागी होत आहेत.

राज्यातील यंदाचा ऊस हंगाम पाहता लागवडीचे क्षेत्र कमी झाल्याचे दिसते. यामुळे दराचे कारण आहे. 

गुजरातने चार हजार तर उत्तर प्रदेशात ३२०० रुपये दर मिळाला. महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशाच्या उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. राज्यात ३५०० रुपये भाव मिळाला असता तर क्षेत्र कमी झाले नसते. आता अडीचशे रुपयांची एफआरपी वाढ करून फसवणुकीचा उद्योग सुरू आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून वाढ दिलेली नाही. उसाचे क्षेत्र कमी झाले हे सरकारला माहीत आहे. त्यामुळे अडीचशेंची वाढ केली.

सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका घ्यायची, ही शिवसेनेची पद्धत आहे. तीच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस राष्ट्रवादीची पद्धत असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांविषयी तळमळ आहे तर पंतप्रधानांची आघाडी का सोडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. कर्जमाफीवरून सभागृहात सगळे एकत्र झाले तर मुख्यमंत्र्यांना घरी जावे लागेल. तीन दिवसांच्या अधिवेशनात जीएसटीवर चर्चा होती. शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरण पाहता नाइलाजाने संपावर जावे लागत आहे. प्रश्‍न तडीस लागत नाही तोपर्यंत संप सुरू राहील.

या वेळी गुणाजी शेलार, संभाजी चौगले, दादू मामा कामिरे, बाळासाहेब मिरजे, अजित पाटील, धनाजी कारंडे, माणिक शिंदे, ज्ञानदेव पाटील आदी उपस्थित होते.

वेळकाढूपणाचा तमाशा 
खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्‍लेश यात्रा म्हणजे वेळकाढूपणाचा तमाशा असल्याचे संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते पी. जी. पाटील यांनी सांगितले. कर्जमाफीचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यायचा आहे. राज्यपालांना निवेदन देऊन काय उपयोग, असे सांगून पाटील यांनी शेट्टी यांचा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचे सांगितले.

Web Title: kolhapur news farmer on strike