दुध संघांत वाढती अस्वस्थता

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 2 जून 2017

एका गावाने संपाची हाक दिली की लगेच शेजारच्या गावातही याची तयारी
होत होती. यामुळे नजीकच्या दोन तीन दिवसात पश्‍चिमेकडील बहुतांशी गावात शंभर टक्के शेतकरी संपात सहभागी होतील अशी शक्‍यता आहे

कोल्हापूर: शेतकरी संपाचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्ह्यात गावागावात
एकजुट होत आहे. अनेक गावे स्वयंस्फुर्तीने एकत्र येत आहेत. राजकीय आरोप
प्रत्यारोपांना भीड भाड न घालता बहुतांशी गावात शेतकरी संपाच्या
निमित्ताने एकी पहावयास मिळत असल्याचे चित्र शुक्रवारी (ता.2) दिवसभर
होते. संपाचा पहिला फटका दुधाला बसणार असल्याने दररोज हजारो लिटर दुध
संकलन बंद होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने संघ चिंतेत आहेत. पश्‍चिम
महाराष्ट्रातील दुध संघाच्या संकलनात सुमारे दहा टक्‍यापर्यंत घट
झाल्याचे दुग्ध संघांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

संपाचा पहिला दिवस अंदाज घेण्यात गेल्यानंतर संपाची व्यापकता पाहून
गावागावातील तरुण मंडळे, शेतकरी मंडळे, ग्रामस्थांतून या प्रश्‍नाविषयी
जागृती होत असल्याचे चित्र गुरुवारी सायंकाळ पासून शुक्रवारी दिवसभर
होते. एका गावाने संपाची हाक दिली की लगेच शेजारच्या गावातही याची तयारी
होत होती. यामुळे नजीकच्या दोन तीन दिवसात पश्‍चिमेकडील बहुतांशी गावात
शंभर टक्के शेतकरी संपात सहभागी होतील अशी शक्‍यता आहे. याचा सर्वाधिक
फटका दुधालाच बसणार आहे. यामुळे नजीकच्या काही दिवसात दुध संकलन कसे
करायचे या चिंतेत दुध संघाचे पदाधिकारी आहेत.

काही दुध संघांनी पोलिस बंदोबस्तात वहाने रवाना केली असली तरी किती दिवस
पोलिस बंदोबस्त वापरणार?..शहरी मागणी कशी पुरवणार याबाबत दिवसभर विविध दुध संघात चर्चा सुरु होत्या. गावोगावच्या दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींचे दूरध्वनी आणि दुध संघापुढे वाढणारा पेच असेच
दृष्य  दिवसभर होते

दुध संकलनाबाबत शुक्रवारी दुपारपर्यंतही कोणत्याही प्रकारच्या स्पष्ट
सुचना दुध संस्थांना दिल्या नव्हत्या. तुमच्या जबाबदारीवर दुध पाठवा, असा
तोंडी आदेश दुध संघ दुध संस्थांना देत होते. यामुळे टॅंकर दुध संघापर्यंत
पोहोचू पर्यंत दुध संस्थांचा जीवात जीव नव्हता. शुक्रवारी ही लवकरात लवकर
टॅकर संघापर्यंत पोचविण्यासाठी दुध संस्थाची धावपळ सुरुच होती.

Web Title: Kolhapur News: Farmer Strike