..तर साखर कारखानदारांच्या घरासमोर ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

जयसिंगपूर - गळीत हंगाम संपून महिना झाला तरी पूर्ण एफआरपी व थकीत कालावधीतील रकमेवर पंधरा टक्के व्याज कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिले नाही. 27 मेपर्यंत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास शिरोळ आणि हातकणंगले तालुक्‍यातील साखर कारखानदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत दिला. 

श्री. चुडमुंगे म्हणाले, ""ऊस तुटल्यानंतर दोन आठवड्यांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, हंगाम संपला तरी अद्याप पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली नाही. शिवाय थकीत कालावधीतील पंधरा टक्के व्याजापासून शेतकरी वंचित आहेत. 23 एप्रिल 2018 पर्यंत थकीत एफआरपी देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. चार मे रोजी लेखी पत्र देऊनही थकीत एफआरपी व व्याजाबाबत कारखान्यांनी विचार केला नाही. उसाची बिले वेळेत न मिळाल्यामुळे ऊसउत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

पीककर्ज न फिटल्यामुळे व्याजसवलत मिळाली नाही. ऊस तुटल्यानंतर शेतीच्या मशागतीसाठीही हात पसरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एफआरपी मिळेल या आशेवर शेतकरी आहे. शेतकरी लाचार नाही. तो पैसे मागत नाही याचा अर्थ त्याला पैशाची गरज नाही असा होत नाही. शेतकऱ्यांना एफआरपी देऊन त्यांची आर्थिक कोंडी दूर करण्याची जबाबदारी कारखानदारांची आहे.'' 

साखर आयुक्तांचे आदेशही कारखानदारांनी पाळले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कारखानदारांविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आंदोलन अंकुशच्या आंदोलनात शेतकऱ्यांचाही सहभाग वाढतो आहे. 27 मेपर्यंत थकीत बिले न मिळाल्यास दोन्ही तालुक्‍यांतील कारखानदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

Web Title: Kolhapur News farmers agitation for Sugarcane rate