साहेब, तुमच्यामुळे मला दैवत भेटलं

राजेश मोरे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

वर्ध्यातील पिता-पुत्राची झाली गळाभेट; पोलिसांच्या तत्‍परतेचे कौतुक 

वर्ध्यातील पिता-पुत्राची झाली गळाभेट; पोलिसांच्या तत्‍परतेचे कौतुक 
कोल्हापूर - सगळं सुरळीत असलेल्या घरातून अचानक दोन महिन्यांपूर्वी वडील बेपत्ता झाले. मुलाने सर्वत्र शोध घेऊनही सापडले नाहीत. दोन दिवसांपूर्वी पोलिसांकडून वडील सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल असल्याची माहिती मिळाली. मुलगा शहरात आला. तोपर्यंत वडील रुग्णालयातून निघून गेल्याचे समजताच त्याला धक्का बसला. सीपीआर चौकीतील दोन पोलिसांनी मुलाला धीर देत तुझ्या वडिलांना नक्की शोधू, असा शब्द दिला. ते पिता-पुत्राची भेट घालूनच थांबले. त्या क्षणी मुलाच्या डोळ्यांत दुःखाश्रूंची जागा आनंदाश्रूंनी घेतली. ‘साहेब, तुमच्यामुळे मला माझे दैवत भेटलं...’ या एकाच वाक्‍यात मिळालेला पुरस्कार पोलिसांसाठी लाखमोलाचा ठरला.

वर्धा जिल्ह्यातील एका गावात लक्ष्मण रमधाम (वय ६०) हे मुलगा राजेंद्र (वय ४०), सुनेसह राहत होते. वडील व मुलगा मजुरी करून घर चालवतात. दोन महिन्यांपूर्वी वडील अचानक बेपत्ता झाले. भरल्या संसारात कर्ता पुरुष कुठे गेला असेल, याचा घोर घराला लागला. मुलगा मजल दरमजल करीत वडिलांचा शोध घेत होता; पण पदरी निराशाच येत होती. 

सायबर चौकात आठ दिवसांपूर्वी एक वृद्ध बेवारस स्थितीत पडल्याचे नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला कळवले. रुग्णवाहिका दाखल झाली. वृद्धाला घेऊन सीपीआरमध्ये दाखल केले. तेव्हा पोलिसांनी आपण कुठले, अशी चौकशी केली. तेव्हा त्या वृद्धाने फक्त ‘वर्धा’ एवढेच सांगितले. त्याआधारे पोलिसांनी संबंधित पोलिस ठाण्यांशी संपर्क साधला. तेव्हा तेथील पोलिसांनी हरवल्याची तक्रार देण्यास आलेल्या मुलाला तुझे वडील कोल्हापुरात असल्याचे सांगितले. तो तडक कोल्हापुरात आला. त्याने सीपीआर चौकीतील लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पी. के. जाधव व पोलिस नाईक एस. बी. पाटील यांच्याकडे वडिलांबाबत चौकशी केली. तेव्हा उपचारानंतर वडील तेथून निघून गेल्याचे समजले. मुलगा धाय मोकलून रडू लागला. तसे पोलिस कर्मचारी जाधव व पाटील यांनी वडिलांना शोधण्याची जबाबदारी घेतली. 

त्यांनी सीपीआर, टाऊन हॉल, सिद्धार्थनगर, दसरा चौक पिंजून काढला. अखेरीस कसबा बावडा रोडवरील एका बसथांब्याखाली काल जाधव यांना एक वृद्ध व्यक्ती झोपलेली दिसली. त्या व्यक्तीचा अंदाज घेऊन पोलिसांनी हाच तो मुलाचा वडील असल्याचा अंदाज बांधला. बस स्टॉपवरून त्याला उठवून बसवले. त्यांचे केस, कपडे व्यवस्थित केले. त्यांच्या चहा-नाष्ट्याची सोय केली. ते पुन्हा कोठेतरी जातील, याची दक्षता घेत त्यांनी मुलाशी संपर्क साधला. तसा मुलगा नातेवाइकांसह तेथे रिक्षाने आला. दोन महिने घरातून बेपत्ता झालेल्या वडिलांना पाहून त्याने मिठ्ठी मारली. हुंदके देऊन तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याच्या खांद्यावर जाधव व पाटील यांनी हात ठेवला. तसा त्याच्या तोंडातून साहेब तुमच्यामुळे मला माझं दैवत मिळालं, एवढेच शब्द बाहेर आले.

तातडीने निघाले गावी
विसरभोळेपणा आलेल्या वडिलांना आपण कोठून आलो, कोठे निघालो, कोठे राहणार, याची शुद्धच नव्हती. त्यामुळे ते वर्ध्याहून कोल्हापूरपर्यंत कसे आले, कोठे राहिले याची कोणतीच माहिती सांगत नव्हते. मुलगा भेटला, त्याला मात्र त्यांनी क्षणात ओळखले. तसे त्यांचे हरवलेले भान पुन्हा जागे झाले. ते दोघेही आपल्या भरल्या घराच्या ओढीने तातडीने गावी निघाले.

Web Title: kolhapur news father son meet by police