निपाहची इचलकरंजीकरांना धास्ती 

पंडित कोंडेकर
रविवार, 27 मे 2018

इचलकरंजी - केरळ येथे निपाह विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे. पण त्याची धास्ती इचलकरंजीकरांनी घेतली आहे. सुंदर बाग आणि केरळ टुर या विषयी शहरात सोशल मिडियावर चर्चा अधिक होताना दिसत आहे. 

इचलकरंजी - केरळ येथे निपाह विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे. पण त्याची धास्ती इचलकरंजीकरांनी घेतली आहे. सुंदर बाग आणि केरळ टुर या विषयी शहरात सोशल मिडियावर चर्चा अधिक होताना दिसत आहे.

निपाह विषाणूचा संसर्ग हा एका विशिष्ट जातीच्या वटवाघुळापासून होतो. पण येथे सुंदर बागेमध्ये मोठ्या प्रमाणात वटवाघुळांचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता म्हणून सुंदर बाग परिसरात न फिरण्याचा सल्ला सोशल मिडियावरुन दिला जात आहे. दुसरीकडे अनेक कुटुंबांनी निपाह विषाणूच्या धास्तीने केरळची टूर रद्द केली आहे. 

वटवाघुळापासून निपाह विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शहरातील सुंदर बागेमध्ये असणाऱ्या वटवाघुळांची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. काही दिवस सुंदर बागेत जाण्याचे टाळण्याबाबतचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांत गोंधळाचे वातावरण आहे.

वास्तविक शहर व परिसरात तीन प्रजातीतील वटवाघुळे आढळून येतात. निपाह विषाणू पसरविणारे वटवाघूळ आपल्या परिसरात आहे काय, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तरी ही नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती दक्षात घेणे आवश्‍यक असल्याचे मत पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. 

उन्हाळ्यात शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे सहलीवर जातात. केरळमध्ये येथून जाण्याचे नागरिकांचे प्रमाण ही मोठे आहे. पण निपाह विषाणूच्या भितीने अनेक कुटुंबांनी नियोजीत केरळची टूर रद्द केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सोशल मिडीयावरही चर्चा होत आहे. 
 
निपाह विषाणूबाबत शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आवश्‍यक ती खबरदारी घेतली जाईल. 
- डॉ. श्रीकांत सुर्यवंशी
, सहाय्यक वैद्यकीय अधिक्षक 
इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (आयजीएम) 

महाराष्ट्र शासनाकडून आवश्‍यक खबरदारी 
निपाह विषाणूचा महाराष्ट्राला फारसा धोका नसला तरी आवश्‍यक ती खबरदारी घेण्याची सूचना राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचलनालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. यामध्ये निपाह सदृश्‍य आजाराचे सर्व्हेक्षण करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाय योजना आखण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. 

Web Title: Kolhapur News fear of nipah virus in Ichalkarangi