एसटीतील प्रथमोपचार पेट्या गायब

शिवाजी यादव
शुक्रवार, 7 जुलै 2017

कोल्हापूर विभागाचे वास्तव - लाखोंचा खर्च खड्ड्यात; अधिकारी मूग गिळून
कोल्हापूर - सुरक्षित प्रवासाचा दावा करणाऱ्या एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील निम्म्याहून अधिक गाड्यांत प्रथमोपचार पेट्याच नाहीत. ज्या गाड्यांत पेट्या होत्या, त्याही गायब आहेत. राज्यभरात थोड्याफार फरकाने अशीच स्थिती आहे.त्यामुळे अपघात घडलाच तर प्रवाशांना प्रथमोपचारासाठी यातायात करावी लागत आहे. पेट्या गायब होण्यामागे आर्थिक घोळ झाल्याची शक्‍यता प्रवाशांतून वर्तविण्यात येत आहे.

विभागात ९०० गाड्यांपैकी जवळपास साडेआठशे गाड्या विविध मार्गावर धावतात. वर्दळीचे रस्ते, वाहतूक कोंडी, घाट मार्ग तसेच खडकाळ, डोंगराळ भागातून एसटी धावते. निम्म्याहून अधिक गाड्या जुन्याच आहेत. लहान-मोठे अपघात घडतात, तेव्हा अपघाती ठिकाणापासून दवाखाना दूर असतो. अपघात झाल्यास किमान प्रथमोपचाराची सुविधा गाडीतच असावी,यासाठी प्रथमोपचार पेट्या बसविल्या गेल्या.

तीन वर्षांपूर्वी गाड्यात पेट्या बसविल्याचा अहवालही विभाग नियंत्रकांच्या पातळीवर पाठविला; मात्र प्रत्यक्षात पेट्या गायब आहेत. काही जण सांगतात की, अशा पेट्या मोजक्‍याच गाड्यात बसविल्या.अहवाल देताना सर्वच गाड्यांत पेट्या बसविल्याचा दिला. एका पेटीसाठी किमान दोनशे रुपये धरले तरी एक लाख ८० हजार रूपये खर्ची पडले. हा खर्च एका जिल्ह्यात झाला. राज्यातील असा खर्च विचारात घेतल्यास ५० लाखांच्या पुढे जाईल.

अशा पेट्यांसंदर्भात बहुतेक व्यवहार मुख्यालयाकडून झाले आहेत. तिथे वरिष्ठांवर संशय घ्यायचा कोणी, अशा संभ्रमात आगारप्रमुख, वाहतूक अधिकारी, विभाग नियंत्रक मूग गिळून गप्प आहेत. स्थानिक पातळीवर माहिती घेतली असता दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांमध्ये फक्त अशा पेट्या दिसतात. अपघात झाला तर दीर्घ पल्ल्याच्या गाडीला होतो. इतर गाड्यांना होणार नाही, अशा भ्रमात एसटी अधिकारी आहेत काय, असा सवाल प्रवाशांचा आहे.

तपासणीपुरत्याच पेट्या
आरटीओकडून एसटी गाड्यांची चाचणी होते तेव्हा प्रत्येक गाडीत प्रथमोपचार पेट्या बसविलेल्या आहेत का,हे पाहिले जाते. त्यानंतर गाडी प्रवासी सेवेत आली की दीर्घकाळ चाचणी होत नाही. अशा पद्धतीने अनेक जुन्या गाड्यांमध्ये चाचणीपुरत्या पेट्या बसविल्या जातात. परिवहन विभागाने रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांची तपासणी केल्यास हा प्रकार उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: kolhapur news First Aid box in ST missing