भोगावती, कुंभी नदीत रसायन टाकून मासेमारी

कुंडलिक पाटील
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

कुडित्रे - पंचगंगा नदी प्रदूषणात भर टाकणारे प्रकार राजरोस सुरू असतानाच आज दोनवडे व कोपार्डे (ता. करवीर) येथे कुंभी व भोगावती नदीपात्रांत रसायन टाकून मासेमारीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत करवीर पोलिसांनी आज कर्नाटकातील तिघांना ताब्यात घेतले. फकीर पाचंगे, कुमार पाचंगे, शंकर पाचंगे (तिघे रा. कडूर, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत.

कुडित्रे - पंचगंगा नदी प्रदूषणात भर टाकणारे प्रकार राजरोस सुरू असतानाच आज दोनवडे व कोपार्डे (ता. करवीर) येथे कुंभी व भोगावती नदीपात्रांत रसायन टाकून मासेमारीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत करवीर पोलिसांनी आज कर्नाटकातील तिघांना ताब्यात घेतले. फकीर पाचंगे, कुमार पाचंगे, शंकर पाचंगे (तिघे रा. कडूर, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत.

पाणीप्रदूषण करून अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भोई समाज संघटनेने केली आहे.
या प्रकाराबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - भोगावती व कुंभी नदीकाठांवर गेले आठ दिवस एक कुटुंब चारचाकी वाहनासह मासेमारीसाठी आले आहे. आनंद पाचंगे, फकीर पाचंगे, मंजू धाकलाई, शंकर पाचंगे, सरोजा पाचंगे, लक्ष्मी पाचंगे, सरू पाचंगे (सर्व रा. कडूर, जि. चिकमंगळूर) अशी त्यांची नावे आहेत. हे कुटुंब रात्री जाळे टाकून पाण्यात जाऊन टोपलीने मासे पकडतात. सकाळी त्याची विक्री करतात. छोट्या माशांसह मोठे मासे पकडून १५० ते २०० रुपये कमी दराने विक्री करत होते.

मासे केमिकलने मारतात का जाळे टाकून पकडतात, हे समजत नसल्याने लोक मासे खरेदी करीत होते. मोठ्या प्रमाणावर मासे कसे मरतात, असे प्रश्‍न नागरिकांना पडत होते. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, आम्ही जाळ्यानेच मासे धरत असल्याचे ते सांगत होते. स्वस्त मासे मिळत असलेले नागरिक थेट नदीवर येऊन मासे विकत घेत होते. दरम्यान नागरिकांच्या तक्रारीनंतर करवीर पोलिसांनी सूचना देऊनही मासेमारी सुरूच होती. 

कोपार्डे येथे आज भोई समाज संघटनेने पोलिसांना बोलावून आणले आणि मासेमारी करणाऱ्या कुटुंबास ताब्यात घेण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी पुरुष, महिला आणि मुले अशा सातजणांना करवीर पोलिस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबत भोई समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. एकनाथ काटकर म्हणाले, ‘‘नदीच्या पाण्यात रसायन टाकून मासे मारले जातात. दररोज टन दोन टन मासे मारले जातात. रसायनामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. रात्री अकरा ते पहाटे सहा या वेळेतच मासे मारणे व गोळा करणे चालते. ही अवैध मासेमारी असून राजकीय वरदहस्ताखाली सुरू होती. याचा तपास करावा. अशा मासेमारीमुळे पाच ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.’’

अशा प्रकारांना आळा घाला...
कुंभी, भोगावती व पंचगंगा नद्यांचे प्रदूषण वाढत असताना मासे मारताना रसायनाचा वापर केल्याने प्रदूषणात पुन्हा भरच पडणार आहे. हेच दूषित पाणी ग्रामीण भागासह शहरवासीयांपर्यंत पिण्यासाठी जात आहे. अशा प्रकारांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी भोई समाज संघटनेसह लोकांची आहे.

Web Title: Kolhapur News fishing by using chemicals