विहिरीतून पाच गव्यांची सुखरूप सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

गगनबावडा - तालुक्‍यातील सैतवडे पैकी भूतलवाडी येथे विहिरीत पडलेल्या पाच गव्यांना वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांनी  आज सुखरूप बाहेर काढले. सैतवडे पैकी भूतलवाडी येथील धोंडबा भूतल यांच्या मालकीच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी पाचही गवे उतरले होते; पण विहिरीत चिखल असल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. 

गगनबावडा - तालुक्‍यातील सैतवडे पैकी भूतलवाडी येथे विहिरीत पडलेल्या पाच गव्यांना वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांनी  आज सुखरूप बाहेर काढले. सैतवडे पैकी भूतलवाडी येथील धोंडबा भूतल यांच्या मालकीच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी पाचही गवे उतरले होते; पण विहिरीत चिखल असल्याने त्यांना बाहेर निघता आले नाही. 

येथील वनविभाग तसेच घटनास्थळी मिळालेली माहिती अशी - शनिवारी रात्री पाण्याचा शोध घेत पाच गवे भूतल यांच्या विहिरीत उतरले. विहीर चरसदृश आहे. विहिरीतून गवे उतरलेल्या बाजूला चिखल अधिक आहे. दुसरा मार्ग नसल्यामुळे गवे विहिरीतच अडकून पडले. श्री. भूतल सकाळी विहिरीकडे गेले तेव्हा त्यांना गवे दिसले. त्यांनी ही घटना तत्काळ ग्रामस्थांना सांगितली. वनविभागाला माहिती मिळताच परिक्षेत्र वनाधिकारी पी. एस. पाटील घटनास्थळी आले. परिसरातील लोकांनी गवे पाहण्यासाठी गर्दी केली. 

गर्दी हटवून खोदाई यंत्राच्या साहाय्याने विहिरीतून गव्यांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी वाट तयार केली. सर्व गव्यांना सुखरूप बाहेर काढले. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा वनपाल शैलेश शेवडे, वनपाल मिलिंद शिराळे, वनरक्षक विश्वास पाटील, सर्जेराव पाटील, सागर पताडे, उत्तम भिसे, नवाळी, महादेव कुंभार, सहायक कर्मचारी विजय सूर्यवंशी, शौकत महात, रामचंद्र पाटील, भगवान कांबळे, भागोजी आडूळकर, पोलिस पाटील संजय वरेकर यांच्यासह स्थानिकांनी मोहीम राबविली.

सैतवडेचे शेतकरी गव्यांमुळे हैराण
सैतवडे परिसरातील शेतकरी गव्यांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. राखणीला जाण्यासाठी थोडा जरी वेळ झाला, तरी गवे शेतातील पीक फस्त करून टाकतात, असे भूतलवाडी येथील शेतकरी बाळू जाधव यांनी सांगितले. 

तालुक्‍यातील अपवाद वगळता बहुतेक शेतकरीवर्गाचे शेत जंगलालगत आहे. त्यामुळे रात्र-रात्र शेतात जागून राखण करण्याशिवाय शेतकरीवर्गाकडे दुसरा पर्याय नाही. पंधरा दिवसांपूर्वीच राखणीला जाण्यासाठी थोडा वेळ झाला. तेवढ्या वेळेत गव्यांनी अर्धा एकर मका खाऊन फस्त केला. शासनाच्या नियमानुसार गवे मारता येत नाहीत. त्यामुळे शेतकरी फटाके लावून किंवा डबे वाजवून त्यांना पिटाळून लावतात; मात्र गवे एका शेतातून दुसऱ्या शेतात जातात. रात्रीतून कधी गवे येतील आणि पीक उद्‌ध्वस्त करतील, याचा नेम नसल्यामुळे शेतकरी रात्रभर जागाच असतो. यामुळे गव्यांच्या त्रासाने शेतकरी वैतागून गेला असल्याचे बाळू जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: Kolhapur News Five Gava fall in well