कोल्हापुरात पुरामुळे ५ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान 

कोल्हापुरात पुरामुळे ५ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान 

कोल्हापूर - गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने आडसाली ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

अद्याप नेमके किती नुकसान झाले आहे. याचा आकडा सामोरा आला नसला तरी किमान पाच हजार हेक्‍टरवरील विविध पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अद्यापही कृषी विभागाच्यावतीने पंचनाम्याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. 

यात लहान उसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने आता या शेतकऱ्यांना पुर्नलागवड करावी लागण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस, एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात तर साठ हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनचे पिक आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. एक ते दीड हजार हेक्‍टरवरील भातालाही याचा फटका बसल्याचा अंदाज आहे. 

गगनबावडा, राधानगरी, करवीर, पन्हाळा तालुक्‍यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. पंचगंगा, वारणा, दुधगंगा, भोगावती, हिरण्यकेशी आदी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर तीन ते चार दिवस शिवारात थांबून राहिले. यामुळे कोवळ्या खरीप पिकांचे नुकसान जादा झाल्याची भिती आहे.

धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणी ओसरण्याची गती धीमी राहिली. यामुळे अनेक शेतामध्ये पाण्याचा मुक्काम तीन ते चार दिवस राहिला. आडसाली लावण केलेला तीन ते चार फुटापेक्षा कमी उंचीचा असलेल्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. गाळामुळे जमिनीची प्रत काही ठिकाणी चांगली झाली, पण ऊस, सोयाबीनच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले. 

गगनबावड्यात मोठे नुकसान

दरम्यान गगनबावडा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे उस, भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील नुकसानीचे पंचनामे करावेत व ओला दुष्काळ जाहीर करुन भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची कृषी पंपाचे बिल माफ करावे अशी मागणी गगनबावडा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांच्यावतीने नुकतेच तहसिलदार रावसाहेब चाटे यांना देण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com