जागतीक फुटबॉल स्‍पर्धेवर लक्ष केंद्रीत - अनिकेत जाधव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

कोल्हापूर - फुटबॉलमधील टॅलेंटला वाव देण्यासाठी कोल्हापुरात सॉकर स्कूल सुरू करायला हवे, अशी अपेक्षा सतरा वर्षाखालील भारतीय संघातील स्टार फुटबॉलपटू अनिकेत अनिल जाधव याने आज येथे व्यक्त केली. मी माझ्या ध्येयापर्यंत पोचलेलो नाही, असे सांगत सतरा वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेवर पूर्णत: लक्ष केंद्रीत केल्याचे त्याने स्पष्ट केले. तो नुकताच कोल्हापुरात आला असून, त्याने युरोप दौऱ्यातील अनुभवांसह फुटबॉलमधील बदलत्या प्रवाहाचा वेध घेतला. 

कोल्हापूर - फुटबॉलमधील टॅलेंटला वाव देण्यासाठी कोल्हापुरात सॉकर स्कूल सुरू करायला हवे, अशी अपेक्षा सतरा वर्षाखालील भारतीय संघातील स्टार फुटबॉलपटू अनिकेत अनिल जाधव याने आज येथे व्यक्त केली. मी माझ्या ध्येयापर्यंत पोचलेलो नाही, असे सांगत सतरा वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेवर पूर्णत: लक्ष केंद्रीत केल्याचे त्याने स्पष्ट केले. तो नुकताच कोल्हापुरात आला असून, त्याने युरोप दौऱ्यातील अनुभवांसह फुटबॉलमधील बदलत्या प्रवाहाचा वेध घेतला. 

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे व मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी शाहूपुरीतील त्याचे घर नातेवाईक व मित्र परिवाराने गजबजून गेले होते. 

अनिकेत म्हणाला, 'युरोप दौऱ्यातील अनुभव मोलाचा होता. पोर्तुगाल, इटली, फ्रान्स, हंगेरी, स्पेनविरूद्ध सामने झाले. मुळचे पोर्तुगालचे असलेले प्रशिक्षक लुईन नॉर्टन यांच्या मार्गदर्शनाखाली या संघांविरूद्ध सामने खेळविण्याचा अनुभव विलक्षण होता. या दौऱ्यात मी सात गोल केले. इटलीच्या नॅशनल टीमबरोबर खेळताना आमचा कस लागला होता. मात्र, हा सामना आम्ही २-०ने जिंकला. हे यश आमचे प्रशिक्षक नॉर्टन यांचे आहे. त्यांनी आमच्या नैसर्गिक खेळावर दाखविलेला विश्‍वास आहे. ते दररोज दीड तास आमचा सराव घेतात. त्यानंतर पाऊण तास व्यायाम आणि त्यानंतर स्विमींग असे वेळापत्रक ठरलेले आहे. संघाचा भर केवळ एका खेळाडूवर नसल्याने प्रत्येकाचे शंभर टक्के योगदान मोलाचे असल्याने त्यादृष्टीने नॉर्टन आम्हाला फुटबॉलमधील टिप्स देत राहतात.’’ सिक्कीमचा कोमल थटाल, मुंबईचा सौरभ मेहर, मणीपूरचा अमरजित सिंग व सुरेश सिंग, बंगळूरचा संजीव स्टॅलिन, केरळचा राहुल के. पी, कोलकत्याचा अभिजित सरकार, दिल्लीचा शुभम सारंगी असे वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या खेळाडूंनी आमचा संघ बांधला गेला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील फुटबॉलबद्दल खूप काही ऐकायला मिळते, असेही त्याने स्पष्ट केले.  

परदेशातील फुटबॉल मुलाच्या पाचव्या वर्षापासूनच सुरू होतो. त्यांचे खेळातील तंत्र, आहार ठरलेला आहे, असे सांगून तो म्हणाला, ‘‘ भारतात सर्वत्र फुटबॉल क्रीम आहे. पण, त्यासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. मी पुणे फुटबॉल क्‍लबमधून खेळताना मला प्रोफेशनल करियर काय असते, हे कळाले. तशी जाणीव प्रत्येक खेळाडूंत निर्माण करायची असल्यास, त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. विशेष म्हणजे खेळाडूंनीसुद्धा शिस्तबद्ध असणे आवश्‍यक आहे. पालकांत फुटबॉलमधील करियरबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारे व त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांचीसुद्धा आवश्‍यकता आहे. भारतीय संघातील बायचुंग भुतिया, अभिषेक यादव व सुनील छेत्री यांनी माझा खेळ पाहून माझे कौतुक केले आहे. असे कौतुक होत असताना माझी जबाबदारी खूपच वाढली आहे. मला त्यांचा विश्‍वास सार्थ करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागत आहेत. या परिश्रमातूनच मी कोल्हापूरचे, महाराष्ट्राचे व देशाचे नाव उचांवू शकेन.’’ 

मुलांसाठी प्रशिक्षण हवे
तेरा वर्षाखालील आयलीग स्पर्धेत मी खेळलो आहे. त्यामुळे तेथील तंत्रशुद्ध प्रशिक्षण काय दिले जाते, याचा धडाच मला मिळाला. केवळ मैदान चांगल्या दर्जाचे नाही. म्हणून मुलांना फुटबॉल खेळता येत नाही. फुटबॉल कल्चरचा विकास करण्यासाठी छोट्या मुलांसाठी प्रशिक्षण सुरू करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

खेळण्याची स्टाईल 
युरोप दौऱ्यात मी ज्या पद्धतीने खेळलो, त्यावर तेथील प्रशिक्षक आश्‍चर्यचकित व्हायचे. ते मला वेगवान खेळाडू म्हणून शाबासकी द्यायचे. पोर्तुगालच्या बेनफिका या पोर्तुगालमधील सर्वोत्तम क्‍लबविरूद्ध आम्ही सामना हरलो. मात्र, त्यातून त्यांच्या खेळण्याची स्टाईल आम्हाला समजून घेता आली, अशी कबुली अनिकेतने प्रामाणिकपणे दिली.

Web Title: kolhapur news Focus on the world football tournament