कोल्हापूरकरांच्या जल्लोषी स्वागताने भारावला अनिकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर: शाहूपुरीतील सहाव्या गल्लीत सायंकाळी आनंदाच्या लाटा उसळल्या. बच्चेकंपनीच्या जल्लोषाने गल्लीत उत्साह सळसळला. गल्लीत इतका आनंद कशासाठी, याचा अंदाजच येत नव्हता. मात्र, अखेर ज्याच्या प्रतीक्षेत गल्ली होती, तो आला आणि त्याच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला. सतरा वर्षांखालील फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाने मने जिंकणारा कोल्हापूरचा अनिकेत जाधव गल्लीत येताच त्याच्याभोवती फुटबॉलप्रेमींचा गराडा पडला

कोल्हापूर: शाहूपुरीतील सहाव्या गल्लीत सायंकाळी आनंदाच्या लाटा उसळल्या. बच्चेकंपनीच्या जल्लोषाने गल्लीत उत्साह सळसळला. गल्लीत इतका आनंद कशासाठी, याचा अंदाजच येत नव्हता. मात्र, अखेर ज्याच्या प्रतीक्षेत गल्ली होती, तो आला आणि त्याच्या जयजयकाराने परिसर दणाणून गेला. सतरा वर्षांखालील फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाने मने जिंकणारा कोल्हापूरचा अनिकेत जाधव गल्लीत येताच त्याच्याभोवती फुटबॉलप्रेमींचा गराडा पडला आणि त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठीचा क्षण अनेकांच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाला. 

अमेरिका, कोलंबिया व घानाविरुद्ध अनिकेतने उत्कृष्ट खेळ केला. त्याच्या धडकी भरविणाऱ्या खेळीची प्रतिस्पर्धी संघांनी धास्तीही घेतली होती. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर अप्रतिम खेळाचे दर्शन घडविल्यानंतर अनिकेत आज सायंकाळी कोल्हापुरात परतला. त्याच्या स्वागतासाठी शाहूपुरी सहावी गल्ली सायंकाळपासूनच प्रतीक्षेत होती. बालचमू त्याला पाहण्यासाठी गल्लीत थांबून होते.

शहरातील ठिकठिकाणाहून फुटबॉलप्रेमी येऊन थांबले होते. तो गल्लीत येताच आतषबाजी झाली. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. त्याने घरात पाय ठेवताच फुटबॉलप्रेमींच्या गर्दीने घरात पाय ठेवायला जागा उरली नाही.

फुटबॉलप्रेमींच्या रांगा घराबाहेर लागल्या. मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्याचे स्वागत करीत त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. त्यानंतर अनिकेतला हस्तांदोलन करण्यासाठी फुटबॉलप्रेमींची चढाओढ लागली. प्रत्येकाने त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या शुभेच्छांनी अनिकेत भारावला होता. 

आई कार्तिकी, बहीण काजल, आजी शारूबाई, मामा संजय जाधव हे त्याचे होणारे कौतुक पाहून आनंदात होते. या वेळी नगरसेवक राजाराम गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, संजय आवटे, संतोष हराळे, संभाजी पाटील-मांगोरे, विश्‍वास कांबळे, राजेंद्र दळवी, नंदकुमार सूर्यवंशी, राजेंद्र राऊत, संतोष पोवार, लाला गायकवाड, अफजल देवळकर, संजय माने, शशिकांत हांजगे उपस्थित होते. 

खरेतर तिन्ही सामन्यांतील अपयशाने मी नाराज होतो. मात्र, कोल्हापूरकरांनी केलेल्या जल्लोषी स्वागताने मी भारावलो आहे. यापुढेही त्यांचे पाठबळ मला मिळत राहील, असा मला विश्‍वास आहे.
- अनिकेत जाधव, फुटबॉलपटू

Web Title: Kolhapur News football fans welcome Aniket Jadav