फुटबॉल पंढरीने अनुभवला दिवसभर फुटबॉल फिव्हर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : फुटबॉलच्या पंढरीत फुटबॉलचा फिव्हर काय असतो, याची प्रचिती आज येथे आली. ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनमुराद फुटबॉल खेळण्याचा अनुभव घेतला. महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर दिवसभर फुटबॉल एके फुटबॉल असेच वातावरण राहिले. 

कोल्हापूर : फुटबॉलच्या पंढरीत फुटबॉलचा फिव्हर काय असतो, याची प्रचिती आज येथे आली. ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनमुराद फुटबॉल खेळण्याचा अनुभव घेतला. महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर दिवसभर फुटबॉल एके फुटबॉल असेच वातावरण राहिले. 

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महापौर हसीना फरास यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, कोल्हापूर स्पोर्टस्‌ डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह व श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसतर्फे कार्यक्रम झाला. 

हलगी, घुमकं, कैताळच्या कडकडाटाने सकाळी नऊपासूनच वातावरण भारले होते. विश्‍वास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिकपटूंनी ‘फिफा’च्या गीतावर आफ्रिकन नृत्याविष्कार सादर केला. मैदानावरील विद्यार्थी-विद्यार्थिनींत उत्साह संचारला होता. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व  श्री. पाटील यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे ‘डॉल्बी हटवा-जीवन वाचवा’ पोस्टरचे प्रकाशन झाले. तसेच श्री. पाटील यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बारा, चौदा, सोळा व खुल्या गटात फुटबॉल स्पर्धा सुरू झाली. जिद्द, चिकाटी, ईर्ष्येचे दर्शन घडवत विद्यार्थी-विद्यार्थिनी खेळत राहिले. 

मैदानावरील सेल्फी पॉइंटवर जाऊन सेल्फी घेण्यात विद्यार्थ्यांसह पालक मग्न झाले. सतरा वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाला शुभेच्छा देण्यासाठी फलकावर शुभेच्छा संदेश लिहिले जाऊ लागले. भारतीय फुटबॉल संघातील अनिकेत जाधव याच्या कटआऊटजवळ उभारून विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतली. 

याच वेळी मैदानाच्या दक्षिणेकडील पायऱ्यांवर बसून विद्यार्थ्यांनी फुटबॉलवर आधारित चित्रे काढण्यास सुरवात केली. फुटबॉल खेळणारे खेळाडू, मैदान, चेंडू घेण्यासाठीची दोन खेळाडूंतील चढाओढ अशी विविध चित्रे रेखाटून विद्यार्थ्यांनी अंगभूत कौशल्य दाखविले. निबंध स्पर्धेद्वारे फुटबॉलची महती स्पष्ट केली. 

या प्रसंगी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, आयुक्त अभिजित चौधरी, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष डी. बी. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हचे अध्यक्ष सुजय पित्रे, प्राचार्य आर. डी. पाटील, माजी उपप्राचार्य आर. व्ही. शेडगे, एस. व्ही. सूर्यवंशी, प्रदीप साळोखे, संदीप पाटील, सचिन पांडव, संतोष पोवार, लाला गायकवाड उपस्थित होते. न्यू कॉलेजचे जिमखाना प्रमुख प्रा. अमर सासने यांनी प्रास्ताविक केले. व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक अजित पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांनी आभार मानले. 

दरम्यान, विविध शाळांतही या उपक्रमांतर्गत फुटबॉल सराव झाला. प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मैदानावर मनसोक्त फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. नगरसेवक संभाजी जाधव, माजी नगरसेवक विनायक फाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. मुख्याध्यापिका एस. एस. तारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापिका एस. एस. कुलकर्णी, एम. आर. गोरे, ए. व्ही. कुंभार, यू. डी. पाटील, डी. सी. पाटील उपस्थित होते. बी. एस. जाधव यांनी प्रास्ताविक केले. 

आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री. पाच्छापुरे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. या वेळी मुख्याध्यापक एस. व्ही. चोकाककर, उपमुख्याध्यापक एस. एन. सूर्यवंशी, पॉल सूर्यवंशी, एन. व्ही. जाधव, एस. ए. बीडकर उपस्थित होते. 

शाहू दयानंद हायस्कूलमध्ये आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते फुटबॉल स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. या वेळी ॲड. इंद्रजितसिंह पाटील-कौलवकर, नगरसेवक विजय सूर्यवंशी, संतोष माळी, संतोष लाड, गणेश देसाई, मुख्याध्यापक ए. आर. भोसले, ए. ए. कारंडे, बी. पी. पाटील उपस्थित होते. ए. आर. कांबळे यांनी आभार मानले. शिवाजी विद्यापीठातील फुटबॉल स्पर्धेत चौदा संघांत स्पर्धा झाली. मुलींच्या चार संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. 

प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेत विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र, पर्यावरणशास्त्र, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, प्राणिशास्त्र, नॅनो सायन्स व तंत्रज्ञान, तंत्रज्ञान अधिविभाग यांसह शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज, स. ब. खाडे महाविद्यालय, कोपार्डे, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, कोल्हापूर, केआयटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर या महाविद्यालयांचे एकूण चौदा संघ सहभागी झाले. जे. एच. इंगळे, डॉ. अभिजित वणिरे, एन. आर. कांबळे, धनंजय पाटील, राहुल मगदूम, विक्रम नांगरे, गॅब्रिएल रॉड्रिग्ज, शशी दाभाडे यांनी स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतले.

मैदानावर सेल्फीसाठी फुटबॉलपटूच्या वेशातील कटआऊट लावले होते. मात्र, त्याच्या कीटचा रंग ब्राझीलच्या संघाप्रमाणे पिवळा-निळा होता. हा उपक्रम भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी असल्याने भारतीय संघाच्या कीटमधील कटआऊट का लावले नाही, असा संतप्त प्रश्‍न फुटबॉलप्रेमींतून उपस्थित झाला.

फुटबॉल टॅलेंट कोल्हापुरात आहे. सतरा वर्षांखालील भारतीय संघात कोल्हापूरचा अनिकेत जाधव आहे. त्याच्यासारखे आणखी खेळाडू भविष्यात निर्माण होत राहतील. 
- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज 

कोल्हापूरला फुटबॉलचा वारसा आहे. फुटबॉलच्या या उपक्रमातून ग्रामीण भागातही फुटबॉलचा प्रसार जोमाने होईल. ठिकठिकाणच्या क्रीडांगणाचा लोकसहभागातून विकास करण्यास प्रयत्नशील राहू. 
- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूरला फुटबॉलचे वेड आहे. गल्लीबोळात फुटबॉल खेळला जात आहे. शेकडो संघ कोल्हापूर जिल्ह्यात फुटबॉल खेळत असून, फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत. 
- महापौर हसीना फरास

Web Title: kolhapur news football matches