गडहिंग्लज ते संतोष ट्रॉफी व्हाया तमिळनाडू!

संदीप खांडेकर
गुरुवार, 21 जून 2018

शहरातील फुटबॉलचे लोण ग्रामीण भागात पोचले आहे. खेळायला सुसज्ज मैदान नाही, संघाचा आर्थिक भार पेलण्यासाठी प्रायोजक नाही, की चांगला प्रशिक्षक नाही. विशेष म्हणजे ‘केएसए’ लीग वगळता एकही ‘नॉक आउट’ स्पर्धा या संघांना खेळायला मिळत नाही. ही स्थिती असूनही फुटबॉलमधील ग्रामीण टॅलेंटचा प्रवास थक्क करणारा आहे. मुंबई, बंगळूर, चेन्नई ते थेट गोव्यातील संघांकडून खेळणारे इथले खेळाडू आहेत. फुटबॉलची एखादी स्पर्धा पदरमोड करून घेण्याची धमकही आहे. यावर टाकलेला प्रकाशझोत...

कोल्हापूर - ब्राझीलची भूमी दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजसारखे छोटेसे गाव त्याच वाटेवर चालणारे. इथले खेळाडू केवळ कोल्हापुरातच खेळतात असे नव्हे, तर मुंबई, बंगळूर, चेन्नई, गोव्यातील स्पर्धांतही त्यांनी ठसा उमटवला आहे. फुटबॉलपटू विक्रम पाटील तमिळनाडूकडून संतोष ट्रॉफी, तर संदीप गोंधळी भारतीय शालेय स्पर्धा १९ वर्षांखालील संघातून खेळला. 

विक्रम हा मिड फिल्डर फुटबॉल प्लेअर आहे. तो दहावीपर्यंत गडहिंग्लजमध्येच शिकला. शिवराज महाविद्यालयातून बी. एस्सी. डबल ग्रॅज्युएट झाला. त्याने उत्कृष्ट खेळाने गडहिंग्लजचे मैदान गाजवले. 

गुणी खेळाडू असूनही त्याला कोल्हापुरातील स्थानिक बलाढ्य संघांनी प्रवेश नाकारला. त्याच्यासमवेत खेळणाऱ्या अन्य खेळाडू मात्र पटापट कोल्हापुरातील संघात दाखल झाले. अखेर ‘केएसए’ वरिष्ठ गटात शेवटच्या स्थानावर असलेल्या अनिल मंडलिक स्पोर्टिंगमधून खेळण्याची त्याला संधी मिळाली. बलाढ्य संघांनी नाकारलेला हा खेळाडू कोल्हापुरात फारसा रमला नाही. संतोष ट्रॉफी खेळण्याची त्याची इच्छा होती. कोल्हापुरातील 
खेळाडूंचे संतोष ट्रॉफीसाठी सिलेक्‍शन होत नसल्याचे पाहिल्यानंतर त्याने थेट तामिळनाडू गाठले. 

त्याने तामिळनाडूचे प्रतिनिधित्व केले. फर्स्ट इलेव्हनमध्ये खेळणारा तो खेळाडू ठरला. वैशिष्ट्य असे की, तो या संघातून खेळत असताना संघाने उपविजेतेपदही पटकाविले. सलग चार वर्षे संतोष ट्रॉफी खेळणारा तो खेळाडू आहे. सध्या तो तामिळनाडूमध्येच केंद्र सरकारच्या एजीएस सेंट्रल गव्हर्न्मेंट डिपार्टमेंटमध्ये सीनिअर ऑडिटर म्हणून नोकरीला आहे.  
संदीपच्या वडिलांचे तो पाच वर्षांचा असताना निधन झाले. त्याची आई लक्ष्मी यांनी त्याला भांडी विकून शिकवले. तो गडहिंग्लजमधील एम. आर. हायस्कूलमधून दहावी, तर कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूलमधून बारावीपर्यंत शिकला आहे. सध्या न्यू कॉलेजमध्ये बी. ए. द्वितीय वर्षात शिकत आहे.

दहावीपर्यंत तो गडहिंग्लजमध्येच खेळला. कोल्हापुरात आल्यानंतर तंत्रशुद्ध खेळाने त्याने अनेकांचे लक्ष वेधले. 
दोन वर्षे १९ वर्षांखालील भारतीय शालेय संघातून तो खेळला. दक्षिण कोरियात झालेल्या १९ वर्षांखालील शालेय स्पर्धेत त्याने भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केले. मात्र, भविष्यातील वाटचालीसाठी या गुणी खेळाडूच्या मागे कोणी उभे राहील का, हाच प्रश्‍न आहे. 

दृष्टिक्षेपात

  • गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनची स्थापना - २००८
  • गडहिंग्लज ग्रामीण विभागांतर्गत नोंदणीकृत संघ - १९

दोन वर्षे गोव्यातील साळगावकर फुटबॉल क्‍लबमधून खेळत होतो. कोल्हापूरप्रमाणे गोव्यात खेळण्याचा अनुभव मोलाचा ठरला आहे. 
- संदीप गोंधळी

Web Title: Kolhapur News Football in Rural area special