बेकायदा वनतळ्यांप्रकरणी वनरक्षक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - पन्हाळा वनक्षेत्र हद्दीतील मौजे पोहाळवाडी (ता. पन्हाळा) येथे ई-निविदा काढण्याआधीच वीस लाखांची दोन वनतळी काढल्याप्रकरणी जबाबदार धरून वनरक्षक नामदेव पाटील यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्‍ला यांनी ही कारवाई केली.

कोल्हापूर - पन्हाळा वनक्षेत्र हद्दीतील मौजे पोहाळवाडी (ता. पन्हाळा) येथे ई-निविदा काढण्याआधीच वीस लाखांची दोन वनतळी काढल्याप्रकरणी जबाबदार धरून वनरक्षक नामदेव पाटील यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. प्रभू नाथ शुक्‍ला यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, यामागचे खरे आणि मुख्य सूत्रधार कारवाईविना असल्याने निर्दोष असल्याच्या अविर्भावात फिरत आहेत. ई-निविदा काढण्याआधीच वनतळी काढल्याचा ‘सकाळ’ने भांडाफोड केला. त्यानुसार याची चौकशी झाली. चौकशीतही निविदा काढण्याआधीच वनतळी काढल्याचे निष्पन झाले. त्यानुसार ही कारवाई केल्याचे डॉ. शुक्‍ला यांनी सांगितले. पोहाळवाडी येथे वनतळी काढण्याबाबत २१ जूनला निविदा काढली गेली; मात्र ही तळी मार्च ते एप्रिल २०१७ लाच पूर्ण केली. त्यामुळे झालेल्या कामाची निविदा काढण्याचा हेतू काय हे गुलदस्त्यातच राहिले. वनक्षेत्रात मूठभर मातीची चोरी करणारा जरी सापडला तरी त्याच्यावर फौजदारी केली जाते.

‘टक्केवारी’साठी संगनमताने केलेल्या या बेकायदा कामात इतरांचाही समावेश असताना केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली. वास्तविक कोण कितीही मोठा माणूस असो किंवा ठेकेदार असो, अधिकाऱ्यांच्या सहमतीशिवाय वनपरिक्षेत्रात खोदाई करण्याचे धाडस करणार नाही. जी खोदाई झाली, ती निविदेतील अंतरानुसार किंवा नियमानुसारच झाली. याची माहिती वरिष्ठांना नव्हती, हे वनक्षेत्रपाल किंवा इतर अधिकाऱ्यांनी सांगणे म्हणजे उपवनसंरक्षकांची दिशाभूल करण्याचाच प्रकार होत आहे.  

उपवनसंरक्षकांचीही दिशाभूल  
निविदा काढण्याआधीच काढलेली वनतळी शासकीय नियमानुसार आणि मापानुसारच काढली गेली आहेत. वनतळ्यांची निविदा कशी काढणार, त्यानुसारच याची कामे झाली असताना ही वनतळी कोणी आणि कशी काढली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांकडून उपवनसंरक्षकांना सांगितले जाते. वास्तविक शासकीय नियमानुसार काढलेल्या वनतळ्यांची माहिती नसल्याचे सांगून उपवनसंरक्षकांचीच दिशाभूल करण्याचे काम काही अधिकारी करत आहेत. 

‘‘पोहाळवाडी येथील निलंबित केलेल्या अधिकाऱ्यावर प्राथमिक जबाबदारी निश्‍चित केली, तरीही यात आणखी कोण कोण जबाबदार आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’’
-डॉ. प्रभू नाथ शुक्‍ला, उपवनसंरक्षक, कोल्हापूर.

Web Title: Kolhapur News forest guard Suspended